मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी फाशीच्या रांगेत असलेला गुन्हेगार व दाऊद इब्राहिमचा या कटातील साथीदार याकुब अब्दुल रझाक मेमन याच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे.
न्या. जे.एस.खेहर व सी.नागप्पन यांनी याबाबत महाराष्ट्र सरकार व इतरांना नोटीस पाठवली असून तोपर्यंत  मेमनची फाशी स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
न्यायालयाने मेमनची मृत्युदंडाच्या शिक्षेबाबतची याचिका घटनापीठाकडे सुनावणीसाठी पाठवली आहे. कारण मृत्युदंडाची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत बंद चेंबरमध्ये हाताळली जात नाहीत तर खुल्या न्यायालयात हाताळली जातात. ज्येष्ठ वकील उपमन्यू हजारिका यांनी मेमन याच्या वतीने बाजू मांडताना सांगितले की, इ.स. २००० मधील लाल किल्ल्यावरील हल्ल्यात महंमद अरीफ याचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले होते.
न्यायालयाने तेव्हा असे म्हटले होते की, ही याचिका लाल किल्ल्यावरील हल्ल्याच्या याचिकेसमवेत सुनावणीसाठी घेण्यात यावी. न्या. पी. सतशिवम व बी.एस.चौहान यांनी २१ मार्च २०१३ रोजी मेमन याची फाशीची शिक्षा योग्य असल्याचा निकाल दिला होता, पण न्यायालयाने टाडा न्यायालयाने वाहनात आरडीएक्स ठेवल्याप्रकरणी इतर दहा जणांची फाशी मुंबईतील विविध बॉम्बस्फोट प्रकरणी रद्द केली होती.  
मेमन यांच्याबाबतच्या प्रकरणात न्यायालयाने असे सांगितले की, तो मुंबईतील बॉम्बस्फोटांचा सूत्रधार होता व त्या १२ बॉम्बस्फोटात २५७ ठार तर ७०० जण जखमी झाले होते. न्यायालयाने असेही सांगितले होते की,या प्रकरणातील इतर १० जण हे समाजातील तळागाळाच्या घटकातील असून त्यांना नोकऱ्या नसल्याने ते मुख्य कटकर्त्यांच्या आमिषांना बळी पडले. मेमन व फरारी असलेले दाऊद व इतर हे खरे कटकर्ते असून त्यांनी स्फोटांचा कट रचला, अपील करणारे ते १० जण त्या बॉम्बस्फोटातील किरकोळ भूमिकेत होते. याकुब व इतर फरारी लोक हे धनुर्धारी होते व इतर अपीलकर्ते हे त्यांच्या भात्यातील बाण होते.
यापूर्वी अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्याने अगोदरच १८ महिने तुरुंगात काढलेले असल्याने त्याची ६ वर्षांची शिक्षा पाच वर्षे करण्यात आली होती. अब्दुल गनी इस्माईल तुर्क, परवेझ नझीर अहमद शेख, मुश्ताक तराणी, असगर मुकादम, शहानवाझ कुरेशी, शोएब घनसार , फिरोझ अमनी मल्की, झाकीर हुसेन, अब्दुल अख्तर खान व फारूख पावले यांची फाशी रद्द करून त्यांना जन्मठेप देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ज्या दोघांना सोडून दिले व ज्या ८४ जणांवरील आरोप सिद्ध झाल्याचे सांगितले व तरीही जे जामीनावर सुटले त्यांना तुरुंगवास पूर्ण करण्यास सांगितले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, ज्यांना जन्मठेप झाली आहे त्यांना मरेपर्यंत तुरुंगात रहावे लागेल. याकूब मेमन याला आरडीएक्स व इतर स्फोटकांपासून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण मिळाले होते त्यात एके ५६ रायफली चालवणे, हातबॉम्ब टाकणे हे प्रशिक्षण पाकिस्तानातून मिळाले होते हे बॉम्बस्फोट संघटितपणे व पद्धतशीरपणे करण्यात आले होते.

Story img Loader