शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. यावर आता मंगळवारी (६ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाने एकत्रितपणे सुनावणी घेतली जाईल, असं स्पष्ट करत तारखेची घोषणा केली. यानुसार या सर्व याचिकांवर पुढील महिन्यात १३ जानेवारी २०२३ रोजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होईल.
या याचिकांवरील सुनावणी करणाऱ्या खंडपीठात सरन्यायाधीश चंद्रचुड यांच्याबरोबर न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा हे असणार आहेत. ही सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार होती. मात्र, त्यावेळी ही सुनावणी न होता पुढे ढकलण्यात आली होती.
मंगळवारी (६ डिसेंबर) सुनावणी करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी यावर पुढील महिन्यातच सुनावणी होऊ शकेल असं म्हटलं. यावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी ही सुनावणी अधिक लवकर घेण्यात यावी, अशी मागणी केली. यावर सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी पुढील आठवड्यात यावर सुनावणी घेणं शक्य नसल्याचं म्हटलं.
“पाच न्यायमूर्तींना घटनापीठात बसणं शक्य होणार नाही”
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड म्हणाले, “पुढील आठवड्यात सुनावणी घेणे शक्य होणार नाही, कारण पुढील आठवड्यात विविध प्रकरणांच्या सुनावणी आहेत. त्यामुळे पाच न्यायमूर्तींना घटनापीठात बसणं शक्य होणार नाही. म्हणून या प्रकरणांवरील सुनावणी १३ जानेवारी २०२३ रोजी ठेवुयात.”
हेही वाचा : Photos : पुणेकर धनंजय चंद्रचूड होणार देशाचे सरन्यायाधीश; मुंबईसहीत अमेरिकेशीही आहे खास नातं…
दरम्यान, २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाने केलेली एक याचिका फेटाळली होती. या याचिकेत ठाकरे गटाने शिवसेना कोणाची यावर निर्णय घेण्यापासून निवडणूक आयोगाला रोखावं, अशी मागणी केली होती.