नवी दिल्ली : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये जमावाच्या मारहाणीत दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तपास देण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.  महाराष्ट्र सरकारने नुकतीच केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे या प्रकरणी तपास करण्यास अनुमती दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी जनहित याचिकाकर्त्यांना सांगितले की, राज्य सरकारने या प्रकरणी ‘सीबाआय’ तपासासाठी या अगोदरच परवानगी दिली आहे. त्यामुळे या याचिकेत आता काही शिल्लक नाही.  यावेळी मुख्य न्यायाधीशांनी १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

दोन साधूंसह तिघांच्या जमावाने केलेल्या कथित हत्याप्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे देण्यास तयार आहोत, असे महाराष्ट्र सरकाने या अगोदर स्पष्ट केले होते.

या हत्याप्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या ‘गुन्हेगार’ पोलिसांना या अगोदरच सजा दिली आहे, असे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. तसेच ‘सीबीआय’ तपास करण्याची याचिका फेटाळण्याची मागणी केली होती.

‘श्री पंच दशाबन जुना आखाडा’च्या साधूंनी आणि मृत साधूंच्या नातेवाईकांसह अन्य नागरिकांनी सीबीआय तपासाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यामध्ये राज्य पोलीस पक्षपाती तपास करत आहे, असा आरोप याचिकेत केला होता. अन्य याचिका वकिल शशांक शेखर झा आणि घनश्याम उपाध्याय यांनी दाखल केली होती.

कोरोना काळात देशात जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदी दरम्यान मुंबईतील कांदिवलीत राहणारे चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०), सुशील गिरी महाराज (३५) आणि नीलेश तेलगडे (३० ) हे सूरत येथे अंत्य संस्कारासाठी निघाले असताना त्यांच्यावर पालघरमधील गडचिंचल गावात जमावाने हल्ला केला होता. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court to hear on nov 15 pleas seeking cbi investigation in palghar lynching case zws