नवी दिल्ली : प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या १,२०० वरून जास्तीत जास्त १,५०० पर्यंत वाढवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सोमवार, २ डिसेंबर रोजी सुनावणी करणार आहे. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर इंदू प्रकाश सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर ही सुनावणी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑगस्ट २०२४ मध्ये भारतातील प्रत्येक मतदारसंघातील मतदारांच्या संख्येबाबत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या दोन निर्देशांना आव्हान देण्यात आले आहे.प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढवण्याचा निर्णय हा मनमानी असून कोणत्याही आकडेवारीवर आधारित नाही, असा युक्तिवाद सिंह यांनी केला आहे. न्यायालयाने आयोगाची भूमिका जाणून घेण्यासाठी याचिकाकर्त्याला आयोगाच्या स्थायी वकिलांना प्रत देण्यास परवानगी दिली होती.

हेही वाचा >>> राज्यभरात थंडी कमी झाली जाणूण घ्या, किमान तापमानात वाढ होण्याची कारणे

जनहित याचिकेत काय?

● निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे पुढील वर्षी होणाऱ्या बिहार आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीवेळी मतदारांवर आयोगाच्या प्रक्रियेचा परिणाम होईल, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

● सामान्यत: मतदान प्रक्रिया ११ तास सुरू राहते. एक मत देण्यासाठी जवळपास ६० ते ९० सेकंदांचा कालावधी लागतो. त्यामुळे एका ईव्हीएमवर कोणत्याही मतदान केंद्रावर एकाच दिवसांत ६६० ते ४९० व्यक्ती मतदान करू शकतात.

● सरासरी मत टक्केवारी ६५.७० टक्के गृहीत धरल्यास १००० मतदारांसाठी असलेल्या मतदान केंद्रावर जवळपास ६५० मतदार येतात.

● असेही काही मतदान केंद्रे आहेत जेथे ८५ ते ९० टक्के मतदान होते. अशा स्थितीत जवळपास २० टक्के मतदार मतदानावेळी बाहेर रांगेत उभे राहतील आणि बराच वेळ वाट पाहावी लागत असल्यामुळे मतदान केंद्राकडे फिरकणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court to hear petition regarding increasing voting figures zws