सर्वोच्च न्यायालयात बिलकिस बानो प्रकरणात ११ दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. बिलकिस बानोच्या वकिलांनी ही याचिका दाखल करताना म्हटलं होतं की अजूनही बिलकिस बानो त्या प्रसंगाच्या धक्क्यातून सावरलेली नाही. अशात दोषी आरोपींची सुटका करण्यात आली. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात प्रश्न उपस्थित केले होते. सर्वोच्च न्यायालयाने नेमक्या कुठल्या निकषांवर ही सुटका केली ते विचारलं होतं.

काय आहे हे प्रकरण?

२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गुजरातच्या गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेसचे डबे जाळण्यात आले होते. या ट्रेनमध्ये कारसेवक अयोध्येहून परतत होते. या घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या घटनेतून वाचवण्यासाठी बिलकिस बानोने तिच्या मुलीसह आणि कुटुंबासह आपलं गाव सोडलं होतं.

३ मार्च २००२ ला काय घडलं?

बिलकिस बानो आणि तिचं कुटुंब जिथे लपलं होतं तिथे ३ मार्च २००२ या दिवशी २० ते ३० लोकांचा जमाव आला. त्यांच्या हातात तलवारी आणि काठ्या होत्या. त्यांनी या घरावर हल्ला केला. तसंच बिलकिस बानोवर सामूहिक बलात्कार झाला. ही भयंकर घटना घडली तेव्हा बिलकिस बानो पाच महिन्यांची गर्भवती होती. तिच्या घरातल्या सात कुटुंबीयांची हत्या करण्यात आली. त्यावेळी तिच्या कुटुंबातले सहाजण पळून गेले होते. या प्रकरणात सीबीआय कोर्टाने ११ जणांना दोषी ठरवण्यात आलं. या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यातल्या एका आरोपीने गुजरात उच्च न्यायालयात एक अर्ज केला होता. त्यात त्याने रिमिशन पॉलिसीच्या अंतर्गत सुटकेची मागणी केली होती. गुजरात उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती.

मे २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला या प्रकरणात निर्णय घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर गुजरात सरकारने एक समिती तयार केली. या समितीच्या शिफारसीनंतर गुजरात सरकारने ११ दोषींची सुटका करण्याचा निर्णय घेतला. या ११ दोषींची सुटका झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं. कारण बिलकिस बानोने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता या याचिकेवर सोमवारी निर्णय दिला जाणार आहे. Live Law ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.