पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावर उत्तर दिलं. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. यावरून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. विरोधकांनी मला पाठ दाखवली नाही, तर संविधानाला पाठ दाखवली, असे ते म्हणाले. तसेच विरोधकांनी आज मर्यादा सोडली, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

सभापती जगदीप धनखड यांच्या विधानावरूनच आता काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मर्यादेचं उल्लंघन हे विरोधकांनी केलं नसून पंतप्रधान मोदींनी केलं आहे, असे त्या म्हणाल्या. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Rajyasabha : मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग; सभापती खंत व्यक्त करीत म्हणाले, “विरोधक सभागृह सोडून नाहीत, मर्यादा…”

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया श्रीनेत?

“आज देशात मर्यादा सोडण्यावरून बरीच चर्चा झाली. सभागृहातील सीसीटीव्हीच्या आधारावर भाजपाचे लोक विरोधकांना मर्यादा शिकवत आहेत. पण मर्यादेबाहेर जाण्याचा सगळा दोष विरोधकांवरच का? ज्यावेळी विरोध पक्षनेते बोलतात, तेव्हा माईक बंद केला जातो. तेव्हा मर्यादेचं उल्लंघन होत नाही का? ज्यावेळी विरोधपक्षातील १४६ खासदारांचे निलंबन होतं आणि त्यानंतर कायदे पारीत केले जातात, तेव्हा मर्यादेचं उल्लंघन होत नाही का?” असं म्हणत त्यांनी राज्यसभेच्या सभापतींना प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे बोलताना, “ज्यावेळी मोदींच्या २ तास १४ मिनिटांच्या भाषणात कॅमेरामॅनने विरोधकांना एकदाही दाखवलं नाही, तेव्हा मर्यादा पाळण्याचा ठेका घेतलेल्यांनी प्रश्न विचारले नाही?” असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच “मणिपूरला मिळून देण्यासाठी आम्हाला १०० वेळा मर्यादेचं उल्लंघन करावं लागलं तरी आम्ही करू”, असेही त्या म्हणाल्या. “हिंसा सुरु असताना मणिपूरकडे डुंकूनही न बघणं हे खरं मर्यादेचं उल्लंघन आहे. खरं तर मर्यादेचं उल्लंघन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – “मला लाथा मारल्या, शिवीगाळ केली कारण…”, विवाहबाह्य संबंधांमुळे मारहाण झालेल्या महिलेनं मांडली व्यथा; म्हणाली, “तुम्ही व्यवस्थेला…”

जगदीप धनखड नेमकं काय म्हणाले होते?

नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना भूमिका मांडायची होती. परंतु, त्यांना बोलू दिलं जात नव्हतं. त्यामुळे त्यांनी व्हेलमध्ये जाऊनही त्यांनी मोदींचं भाषण थांबवण्यासाठी नारेबाजी केली. विरोधकांच्या या कृत्यावर संतापून राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांच्या कृतीवर आक्षेप घेतला. तुम्ही सभागृहाचा आणि संविधनाचा अपमान करताय, असं बजावून सांगितलं. परंतु, विरोधक आपल्या मतापासून दूर हटले नाहीत, विरोधकांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला.

विरोधकांनी सभात्याग केल्यानतंर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी खेद व्यक्त केला होता. “अत्यंत दुःखदायक, अमर्यादित हे कृत्य आहे. मी चर्चा केली, मी अनुरोध केला. विरोधी पक्षातील नेत्यांना कोणत्याही अडथळ्याविना बोलण्याची संधी दिली. आज ते सदन सोडून गेले नाहीत, ते मर्यादा सोडून गेले. आज त्यांनी मला पाठ नाही दाखवली. भारतीय संविधानाला पाठ दाखवली आहे. आज त्यांनी माझा आणि तुमचा अनादर नाही केला, त्या शपथेचा अनादर केला जो संविधानाच्या साक्षीने घेतला आहे”, असे ते म्हणाले होते.