राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे यांनी संसदेत महिला खासदारांमध्ये रंगणाऱया ‘बाकीच्या’ गप्पांबाबत केलेल्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.संसदेत आम्ही महिला खासदार साड्या, पार्लर आणि फॅशनचीही चर्चा करतो, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी नाशिकमधील युवती मेळाव्याच्या उदघाटनावेळी केले. या विधानामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे, तर आपल्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
नाशिकमधील युवती मेळाव्यात बोलत असताना सुप्रिया यांनी संसदेतील काही किस्से उपस्थितांना ऐकवले. त्या म्हणाल्या, संसदेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत असते. सभागृहात असताना मी एखाद्या विषयावरच पहिलं भाषण ऐकते. त्यानंतर दुसरं आणि तिसरं ही ऐकते. दोन-तीन भाषणं झाली की अनेकदा खासदार तेच तेच बोलतात, मग कंटाळा येतो आणि आम्ही महिला खासदार वेळ घालविण्यासाठी साड्या, पार्लर आणि फॅशनच्या गप्पांमध्ये रंगतो. समजा बाजूला बसलेली महिला खासदार चेन्नईची असेल आणि मी तिच्याशी बोलताना टीव्हीवर दिसत असेन तेव्हा पाहणाऱयाला वाटतं की आम्ही एखाद्या गंभीर विषयावर उदा. चेन्नईतील पावसाच्या हाहाकाराबाबत चर्चा करत आहोत. पण प्रत्यक्षात तसे नसते. खासदारांच्या त्याच त्याच भाषणांना कंटाळलेल्या आम्ही महिला खासदारांमध्ये साड्या आणि इतर गोष्टींवर चर्चा अधिक असते, असेही त्या पुढे म्हणाल्या.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सडकून टीका केली. संसदेचे कामकाज सुरू असताना अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर सभागृहात चर्चा सुरू असते. एका जबाबदार महिला खासदाराने असे विधान करून ज्या महिलांनी मोठ्या कष्टाने संसदेचे सदस्यत्व मिळवले. त्यांचा सुप्रिया सुळे यांनी अपमान केला आहे, असे निलम गोऱ्हे म्हणाल्या.

Story img Loader