राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना मराठीत बोलत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यावर निशाणा साधला आहे. भागवत कराड माझ्या राज्यातून येतात असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी जीएसटीबाबत काही त्रुटी असेल तर तुम्ही तातडीने त्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्यावर आक्षेप घेतला. तसेच तुमच्या अर्थविषयक विधेयकात पान क्रमांक ६ वर त्रुटी असल्याचं म्हणत कराड यांना घेरलं. त्या लोकसभेत जीएसटी आणि पीएमएलए कायद्यावर बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला अर्थविषयक गोष्टींची तितकी माहिती नाही. त्यामुळे मला त्याबाबत भागवत कराड यांना विचारायचं आहे. आमच्या राज्यात एक वेगळीच गोष्ट सुरू केलीय. त्यांच्या विचारसरणीचं सरकार नसेल तर देशातील त्या राज्यात असं नेहमीच होतं. जर जीएसटीबाबत काहीही त्रुटी असतील तर तुम्ही तातडीने त्या व्यक्तिला तुरुंगात टाकणार. तुम्ही स्वतःच तुमच्या अर्थविषयक विधेयकात पान क्रमांक ६ वर चुका केल्यात. तुम्ही देखील चूक करू शकतात. आपण माणसं आहोत. कधीतरी माणसाकडून चूक होते. आपण देव थोडेच आहोत.”

“जीएसटी दुरुस्तीला वेळ न देता तुम्ही नागरिकांना तुरुंगात टाकणार का?”

“छोटीशी चूक झाली तर तुम्ही सरळ त्याला तुरुंगात टाकणार का? यावर मंत्रिमंडळात चर्चा झालीय? देशातील सर्व अर्थमंत्रालयांनी यावर सहमती दाखवलीय का? यावर कृपया स्पष्टता द्यावी. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही अर्थसंकल्पात चूक करु शकता. त्यामुळे एखादा व्यक्तीकडून चूक झाली तर त्याला वेळ द्या. आठवडा, ३ महिने किंवा ६ महिन्यात दुरुस्त करू द्या. तुम्ही तसं न करता तुरुंगात टाकणार का?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला.

” एफआयआरशिवाय कोणालाही तुरुंगात कसं टाकता येईल?”

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमच्या राज्यात तर आता स्टाईल झालीय. कोणालाही उचलतात आणि तुरुंगात टाकतात. पीएमएलएवर याच सरकारने टीका केली होती. आता याच सरकारने पीएमएलए अंतर्गत एफआयआरशिवाय कोणालाही तुरुंगात टाकता येईल असं म्हटलं. असं कसं करता येईल हे मला कृपया सांगावं. अगदी सर्वोच्च न्यायालयाने देखील यावर टीका केलीय. प्रत्येकजण टीका करत आहे. कराडजी तुम्ही माझा काय गुन्हा आहे हे तर सांगा. काही विचारणार नाही आणि मला तुरुंगात टाकणार आणि मर्जी होईल तेव्हा एफआयआर करेल असं म्हणणार. ही लोकशाही आहे, असं थोडं चालतं. तुम्ही अशाप्रकारे लोकांना तुरुंगात टाकू शकत नाही.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : …तर मला विजय चौकात फाशी द्या : सुप्रिया सुळे

“आता तर महाराष्ट्रात बायको पोरांनाही नोटीस येत आहे”

“या देशात सगळेच घाबरतात. आम्ही चोरीच्या विरोधात आहोत. तुम्ही व्यवस्थेची साफसफाई करत असाल तर आम्ही पाठिंबा देऊ. एकमताने आम्ही तुमच्यासोबत उभे राहू. मात्र, अन्याय करू नका. कष्ट करणाऱ्यांची एका गोष्टीची पुर्तता झाली नाही त्याला तुरुंगात टाकणार का? कोणाला तुरुंगात टाकलं तर कोणाचं भलं होणार आहे? त्याच्या घरात बायको मुलं असतात. त्यांच्या हालअपेष्टा कधीतरी विचारा. आता तर महाराष्ट्रात फॅशन झालीय. बायको पोरांनाही नोटीस येत आहे,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule criticize bhagwat karad in marathi in parliament over gst and pmla pbs