खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (१३ डिसेंबर) लोकसभेत नार्कोटिक ड्रग्ज आणि अमली पदार्थविषयक विधेयकावरील चर्चेदरम्यान एनसीबी या केंद्रीय संस्थेमार्फत महाराष्ट्रात सुरु असलेल्या मनमानी कारवाईबाबत मत व्यक्त केलं. एनसीबीद्वारे बॉलीवूडला बदनाम करण्याचे काम होत आहे. तसेच तरुण कलाकारांना, विशेषतः तरूण अभिनेत्रींना टार्गेट केले जात असल्याचाही आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. याशिवाय कृषी विधेयक मागे घेताना चर्चा करण्यात आली नाही. मात्र, ड्रग्जवरील छोट्या दुरुस्ती विधेयकाला ४ तास देण्यात आले यावरही सुप्रिया सुळेंनी आक्षेप घेतला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बॉलीवूडच्या माध्यमातून लाखो लोकांचे पोट चालते, जगात देशाला नावलौकीक मिळवून दिला आहे. यात अनेकांचे परिश्रम, अखंड मेहनत आहे. असे असताना एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांकडून बॉलीवूडची बदनामी सुरू आहे. हे अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. हेमा मालिनी, किरण खैर या महिला खासदार देखील बॉलीवूडमधून आल्या आहेत. त्या खूप चांगल्या वक्त्या आहेत. त्यामुळे संपूर्ण बॉलीवूडवर ड्रग्जचे आरोप करणं चुकीचं आहे.”
“एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून पदाचा दुरुपयोग”
“महाराष्ट्र राज्य हे देशात गुटखाबंदी करणारे राज्य आहे. आम्ही जर तंबाखू, गुटख्याविरोधी लढतो आहोत तर ड्रग्स संपवण्यासाठी आम्ही आपल्यासोबत का लढणार नाही. मात्र, अशा कारवाईत जे प्रशासकीय अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करतात अशांना आम्ही खपवून घेणार नाही. ड्रग्सविरोधात लढा द्यायचा असेल तर तरुण मुलामुलींवर कारवाई करण्यापेक्षा मोठ्या आरोपींवर कारवाईची गरज आहे. काही अधिकाऱ्यांकडून पदाचा दुरुपयोग होतोय. एखाद्यावर खोटे आरोप लावून पैसे उकळण्याचे काम होते आहे हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
“कृषी बिल मागे घेताना चर्चा नाही, पण ड्रगवरील बिलावर ४ तास चर्चा?”
सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला छोट्या दुरुस्त्यांवर ४ तास न घालवता हे दुरुस्ती विधेयक मागे घेऊन व्यापक उपाययोजना करणारे विधेयक मांडण्याची आणि त्यासाठी संसदीय समिती गठीत करण्याची मागणी केली.
हेही वाचा : “हे खरंच लाजिरवाणं आहे, जर तुम्हाला राजकीय हल्ला करायचाय तर…”, सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा!
सुप्रिया सुळे यांनी एनसीबीवर आरोप करताना नवाब मलिक यांच्या जावयाला गुन्हा नसताना अनेक महिने तुरुंगात ठेवण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित केला. त्या म्हणाल्या, “एनसीबीने जप्त केलेल्या पदार्थांची चाचणी न करता तंबाखू असूनही ड्रग्जच्या आरोपाखाली मंत्र्यांच्या जावयाला तुरुंगात डांबलं. एखाद्या नेत्याचा जावई असणं हा गुन्हा आहे का?”