सोमवारपासून (१८ सप्टेंबर) संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. जुन्या संसदेतला आजचा शेवटचा दिवस होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भावनिक भाषण केलं. दुसरीकडे, भारतीय संसदेच्या ७५ वर्षाच्या वाटचालीवरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर आरोप असलेल्या सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा उल्लेख करत भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी जेव्हा महाराष्ट्रात आले होते, तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सिंचन आणि बँक घोटाळ्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी संबंधित घोटाळ्यांची चौकशी करावी. चौकशीसाठी आम्ही १०० टक्के सहकार्य करू, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा- “पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक

संसदेत पंतप्रधान मोदींना उद्देशून सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबाबत तुम्ही कोणतीही चौकशी करा. आम्ही त्याला १०० टक्के पाठिंबा देऊ. कारण मला आठवतंय पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक विधान केलं होतं की, एनसीपी ही ‘नॅचरली करप्ट पार्टी’ आहे. त्यांनी दोन घोटाळ्यांचा आरोप केला होता. एक म्हणजे सिंचन घोटाळा आणि दुसरा बँक घोटाळा. मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करते की, पंतप्रधान मोदींची जी इच्छा आहे, ती पूर्ण करा.”

हेही वाचा- “…तर आम्ही सत्तेत आहोत हे विसरून जाऊ”, अजित पवार गटाचा फडणवीसांना थेट इशारा

“आम्ही सहृदयाने तुम्हाला सहकार्य करू. तुम्ही जो भ्रष्टाचारा मुद्दा उपस्थित केला होता, कृपया त्याची चौकशी करा. आम्ही तुम्हाला पूर्णपणे मदत करू. हे केवळ दोनच घोटाळे नाहीत, इतरही काही घोटाळे आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे मी नातेसंबंधाबाबत बोलत नाही. संसदेत माझे ८०० भाऊ आहेत. माझा केवळ एकच भाऊ थोडी आहे. पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबाबत जी तळमळ आहे. त्यांना भ्रष्टाचाराविरोधात जे काही करायचं आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहू”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule demands probe into irrigation scam pm modi allegations on ajit pawar rmm