नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान यंत्रांचा वापर बंद करून पुन्हा मतपत्रिका व मतपेटीद्वारे मतदान घेण्याची मागणी येथील पत्रकार परिषदेत केली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे उत्तम जानकर विजयी झाले. पण त्यांना अपेक्षित असलेली मते मिळाली नाहीत. मतपत्रिकेद्वारे पुन्हा मतदान घ्यावे अशी त्यांनी मागणी केली होती.

मरकटवाडीमध्ये गावकऱ्यांनी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यास सहमती दाखवली. पण ही संपूर्ण प्रक्रिया पोलिसांनी बंद पाडली. आगामी निवडणुका मतपत्रिकेद्वारेच घेतल्या जाव्यात अशी आमची मागणी आहे, असे सुळे म्हणाल्या.

तुतारी वाजवणारा माणूस हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडणूक चिन्ह असताना लोकसभा व विधानसभा निवडणुकीतदेखील अन्य उमेदवाराला तुतारी चिन्ह दिले गेले. तुतारी चिन्ह देऊ नका, मतदारांमधील गोंधळ टाळा, अशी विनंती करूनही आयोगाने आमचे म्हणणे ऐकले नाही. सातारा लोकसभा मतदारसंघात दोन तुतारी चिन्हांचा फटका आमच्या पक्षाला बसला. ही बाब भाजपच्या नेत्यानेच कबूल केली आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मतदारांचे नवे प्रारूप -राऊत

देशातील केंद्रीय निवडणूक आयोग अजून जिवंत असेल तर वाढीव मतदारांबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नांची आयोगाने उत्तरे द्यावीत. पण आयोगाने स्पष्टीकरण दिले नाही तर आयोग केंद्र सरकारची गुलामी करत असल्याचे सिद्ध होईल.

३९ लाख अतिरिक्त मतदार आता पुढे महाराष्ट्रातून कदाचित बिहारला जातील. हे फ्लोटिंग आहेत, तीच नावे, तेच आधार क्रमांक असतील. जिथे निवडणूक तिथे ते जातील. आत्ता त्यातील काही दिल्लीतही आले असतील. नंतर निवडणूक असेल तेव्हा उत्तर प्रदेशमध्येही जातील. हा फ्लोटिंग मतदारांचा नवा पॅटर्न बनला आहे, अशी टीका शिवसेना- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फोडले गेले. या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढा देत आहोत, पण केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हाबाबतही आमच्यावर अन्याय केला. – सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी (शरद पवार)

Story img Loader