राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निश्चलनीकरण आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. त्यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना निश्चलनीकरणातून किती काळा पैसा परत आला असा सवाल केला. तसेच बिचारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खरे निघाले म्हणत शाह यांच्याबद्दल आदर वाटत असल्याचा खोचक टोला लगावला. त्या लोकसभेत निश्चलनीकरण आणि काळा पैसा यावर बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “काळ्या पैशाबाबत बरंच काही बोललं गेलं. निश्चलनीकरण का करण्यात आलं? तुम्ही म्हणाले काळा पैसा परत येईल. निश्चलनीकरणामुळे किती काळा पैसा परत आला हे भागवत कराड यांनी सांगावं. मी आता १५ लाख रुपयांचा हिशोब पण विचारत नाही. बिचारे अमित शाह खरे निघाले. त्यासाठी मला अमित शाह यांचा आदर वाटतो. ते टीव्हीवर खूप चांगलं बोलले. ते म्हणाले हा तर जुमला आहे. ते प्रामाणिकपणे बोलले. मला प्रामाणिक माणसं आवडतात.”
“मी ते १५ लाख सोडून दिले, त्याचा हिशोब मागणार नाही”
“गुजरात-मराठी आपण शेजारी आहोत. त्यामुळे अमित शाह बोलले त्याचं मी स्वागत करते. त्यामुळे मी ते १५ लाख सोडून दिले. मी सरकारकडे त्याचा हिशोब मागणार नाही. पण काळ्या पैशांचा हिशोब मी मागू शकते. ते आमच्यावर काळ्या पैशांवरून इतका हल्ला करत होते. भागवत कराड यांनी काय झालं ते सांगावं. त्याचा काय उपयोग झाला?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
“…तर मला विजय चौकात फाशी द्या”
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दुसरी गोष्ट म्हणजे ही माहिती लिक होत आहे का? जर एक पेपर लिक झाला तर मोठी चौकशी केली जाते. त्या अधिकाऱ्याला तुरुंगात टाकलं जातं. आता जेव्हा तुमचे २ कार्यकर्ते छापे कधी मारणार, तुरुंगात कधी टाकणार याची सर्व माहिती आहे. मी हे सिद्ध करू शकते. तुम्हाला कोणीही विचारणार नाही का? मी मोदी सरकारकडे न्याय मागत आहे.”
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : “कधी तरी चूक होते हो माणसाकडून, आपण…”, लोकसभेत मराठीतून बोलत सुप्रिया सुळेंचा भागवत कराडांना टोला
“आमच्याकडून चूक झाली तर मला फाशी द्या. इथं नाही, मला विजय चौकात फाशी द्या. आमची चूक झाली तर आमच्यावर खटला चालवा. ईडी, सीबीआयचा गैरवापर चुकीचा आहे. आयुष्य खूप कलाटण्या देतं. आम्ही देखील सत्ताधारी बाकांवर बसलो आहोत. कदाचित आमच्याकडून पीएमएलची चूक झालीही असेल, पण म्हणून आम्हाला फाशी देणार का? पारदर्शक काम करा आणि न्याय करा,” असं संतप्त मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.