मणिपूरमध्ये गेल्या चार महिन्यांपासून चालू असणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांचे पडसाद देशभर उमटत आहेत. त्याचबरोबर ते संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटताना दिसत आहेत. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलत नसल्याचा मुद्दा विरोधकांकडून उचलून धरण्यात आला आहे. त्यासाठी विरोधकांनी लोकसभेत थेट अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर मंगळवारी लोकसभेत दोन्ही बाजूंनी जोरदार चर्चा झाली. या चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारला ‘ह्युब्रस’ची (Hubris) उपमा दिली आहे. नेमकं सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
मणिपूरमधील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार आक्रमकपणे पावलं उचलत नसल्याचा मुद्दा उपस्थित करताना सुप्रिया सुळेंनी त्यावरून हल्लाबोल केला. “मणिपूरमध्ये लाजिरवाण्या चुका तिथल्या राज्य सरकारकडून झाल्या आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा. १७९ मृत्यू, ६० हजार लोक बेघर झाले, ३५० रिलीफ कॅम्प, कॅम्पमध्ये निर्वासित ४० हजार, ३६६२ घरं जाळली. ३२१ प्रार्थनास्थळं जाळली. १६१ केंद्रीय दलं तैनात करण्यात आली. १० हजारहून जास्त दंगली, हत्या, बलात्काराची प्रकरणं घडली आहेत. आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.
Video: लोकसभेत पंतप्रधान मोदींवर अविश्वास प्रस्ताव; काँग्रेसनं विचारले तीन प्रश्न, म्हणाले…
केंद्र सरकारला दिला सल्ला
दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळेंनी महात्मा गांधींचा संदर्भ देत केंद्र सरकारला मणिपूरमध्ये कशा पद्धतीने पावलं उचलायला हवीत, याबाबत सल्ला दिला.
“मी तुम्हाला शांती देतो…
मी तुम्हाला प्रेम देतो…
मी तुम्हाला मैत्री देतो…
मी तुमचं सौंदर्य पाहिलं…
मी तुमच्या गरजा ऐकल्या…
मी तुमच्या भावना समजून घेतल्या…
माझं ज्ञान त्या सर्वशक्तीमधून येतं…
मी तुमच्यातल्या आत्म्याला नमन करतो…
चला, एकत्र मिळून एकात्मता व शांततेसाठी काम करुयात” असं महात्मा गांधी म्हणतात. आज ही मणिपूरची खरी गरज आहे. बंदुकांनी आपल्या सर्व समस्या साध्य होणार नाहीत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ज्युलियस सीजरचा ‘तो’ शब्द!
दरम्यान, आपल्या भाषणाचा शेवट करताना रोमन सम्राट ज्युलियस सीजरच्या एका वाक्याचा संदर्भत देत सरकारला टोला लगावला. “जेव्हा मी या सरकारचा विचार करते, तेव्हा पहिला शब्द माझ्या डोक्यात येतो तो म्हणजे ह्युब्रस”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. “प्रत्येक वेळी हे सरकार भविष्याबद्दल बोलत असतं. वर्तमानाबद्दल ते बोलत नाहीत. ‘आम्ही तर येणारच आहोत. तुम्ही संपणार आहात. विरोधक जिंकणारच नाहीत वगैरे’. त्यांच्या वृत्तीसाठी त्यांना हा शब्द लागू पडतो असं वाटतं”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
खासदार म्हणून पहिल्याच भाषणात माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंचं घटनेच्या मूलभूत चौकटीवरच प्रश्नचिन्ह…
‘पॅराडाईज लॉस्ट’मधील ओळी…
यावेळी त्यांनी जॉन मिल्टनच्या ‘पॅरेडाईज लॉस्ट’ या काव्यामध्ये लिहिलेल्या इंग्रजी ओळी वाचून दाखवल्या. त्याचा थोडक्यात सारांश…’जेव्हा तो प्रत्यक्ष इश्वराच्याच स्वर्गातील राज्याविरोधात बंड पुकारतो, तेव्हा तो ह्युब्रस ठरतो. शेवटी तो जाहीर करतो की स्वर्गात गुलामी करण्यापेक्षा नरकात राज्य करणं बेहत्तर’.
ह्युब्रस शब्दाचा अर्थ काय?
दरम्यान, यावेळी त्यांनी ज्युलिअस सीजरनं त्याच्या सहकारी अधिकाऱ्याला उद्देशून “इट्स ओन्ली ह्युब्रस इफ आय फेल” हे वाक्य म्हटल्याचं सांगितलं जातं. ह्युब्रस हा शब्द मूळचा ग्रीक भाषेतला आहे. तत्कालीन रोमन काळात या शब्दाचा वापर केला जात असल्याचं सांगितलं जातं. या शब्दाचा अर्थ अतीआत्मविश्वास किंवा अती अभिमान असा होतो. तत्कालीन साहित्यामध्ये या शब्दाचा वापर गर्वात वावरणाऱ्या व्यक्तीचा शेवटी पराभव होतो अशा अर्थाने वापरला गेल्याचंही सांगितलं जातं.