महागाईच्या मुद्द्यावरून विरोधक मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. महागाई कमी करण्याच्या मागणीसाठी आंदोलनं सुरूयेत. पण महागाई सातत्याने वाढत आहे. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महागाईचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, “सरकारी योजनेंतर्गत महिलांना गॅसची सुविधा देणाऱ्या सरकारने गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. या सरकारने निवडणुकीपूर्वीच म्हटले होते की, ‘बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ हे तर तुम्हाला आठवतच असेल” असं त्यांनी मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना म्हटलं.
दरम्यान, मंत्री मेघवाल म्हणाले की, सध्या महागाई नियंत्रणात आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महागाई नियंत्रणात आहे? सिलिंडर हजार रुपयांचा झाला आहे. मेघवाल जी सभागृहातल्या महिलांचं ऐका, या महिलांमुळेच तुम्ही सरकार स्थापन केलंय.’ त्यानंतर त्यांनी अंडी आणि भाजीपाल्यांच्या वाढत्या किमती लक्षात आणून दिल्या.
पुढे त्या मंत्री मेघवाल यांनी म्हणाल्या की, ‘भाजीचे भाव.. घरी जा आणि वहिनीला विचारा, आज त्या तुम्हालाही बोलतील. आता काही दिवसांपूर्वीच होळी गेलीये, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. देशात दर महिन्याला निवडणूक व्हायला हवी, जेणेकरून पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात राहतील,’ असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.