सूरतमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेतील आरोपींना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवशी एका आरोपीची पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या घटनेनंतर आता बदलापूर प्रकरणात ज्याप्रकारे आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्याप्रमाणे याही प्रकरणात आरोपीचा मृत्यू झाला का? असा प्रश्न निर्माण होत आहे. सूरतचे पोलीस अधीक्षक हितेश जोयसर यांनी सांगितले की, आरोपी शिवशंकर चौरसिया (४५) हा मध्य प्रदेशचा राहणारा होता. गुरुवारी सकाळी त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला. कारागृहातील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार झाल्यानंतर त्याला सूरतच्या न्यू सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी ४ वाजता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी पुढे सांगितले की, आम्ही त्याच्या कुटुंबियांना याबद्दल माहिती दिली असून ते सूरतला येण्यासाठी निघाले आहेत. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येईल.
प्रकरण काय आहे?
मंगळवारी रात्री १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मित्रासह दुचाकीवरून घरी येत होती. मात्र दुचाकीतील इंधन संपल्यामुळे त्यांना रस्त्यातच थांबावे लागले. रस्त्यात थांबले असताना तिथे तीन जण आले आणि त्यांनी दोघांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी मुलीला घटनास्थळावरून उचलून नेले. तसेच तिच्या मित्राचाही फोन हिसकावून नेला. मित्राने स्थानिकांना मदत मागितली पण तोपर्यंत आरोपींनी मुलीवर अत्याचार केला होता.
या घटनेच्या तीन तासांतच पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. मृत आरोपी चौरसिया याच्यासह मुन्ना पासवान (४०) याला अटक करण्यात आली आहे. तर तिसऱ्या आरोपीचा अजूनही शोध सुरू आहे. अटक झाल्यानंतर चौरसिया आणि पासवान यांना सूरत ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
सत्र न्यायालयात दोन्ही आरोपींना सादर केले असताना मुन्ना पासवानला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, तिसरा आरोपी राजू विश्वकर्मा याचा शोध सुरू आहे. तो उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे राहणारा आहे.
© IE Online Media Services (P) Ltd