हिंदू असल्याचं भासवून पत्नीचं धर्मांतर केल्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद अख्तर शेख या इसमाची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सोमवारी सूरतच्या न्यायालयाने या प्रकरणातला निर्णय दिला आहे. मुकेश गुप्ता उर्फ मोहम्मद अख्तर शेख याची आम्ही निर्दोष मुक्तता करतो आहोत असं न्यायालयाने म्हटलं आहे. मुकेश गुप्ता उर्फ मोहम्मदने एका महिलेला आपण हिंदू असल्याचं भासवून तिच्याशी लग्न केलं. त्यानंतर तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्याच्यावर होता त्याच प्रकरणात त्याला २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती.

कोर्टाने काय म्हटलं आहे?

अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी सी. व्ही. राणा यांनी म्हटलं आहे की मोहम्मद शेखची आम्ही निर्दोष मुक्तता करत आहोत. त्याच्यावर जो आरोप करण्यात आला आहे त्याचे पुरावे मिळाले नसल्याने हा निर्णय गेण्यात आला. आरोपी मोहम्मद शेखने मुकेश गुप्ता हे हिंदू नाव धारण करुन एका हिंदू महिलेशी विवाह केला होता. त्याने आधी एक लग्न केले होते ही बाब त्याने लपवली होती असंही कोर्टाने म्हटलं आहे.

हे संपूर्ण प्रकरणच संशयास्पद आहे असंही निरीक्षण याबाबत कोर्टाने नोंदवलं आहे. रेकॉर्डवरचे पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब याचा विचार करता तक्रारदारांना काहीही सिद्ध करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळेच आम्ही मुकेश गुप्ता उर्फ मोहम्मद अख्तर शेखची मुक्तता करत आहोत असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

हे प्रकरण नेमकं काय?

ऑगस्ट २०२१ या महिन्यात सूरत या ठिकाणी पाच मुलांचा बाप असलेल्या मोहम्मद अख्तर शेखने मुकेश गुप्ता हे नाव धारण करत एका हिंदू महिलेशी मंदिरात लग्न केल्याचा प्रकार समोर आला होता. जेव्हा या महिलेला ही बाब समजली तेव्हा तिने मोहम्मदच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. सूरतच्या डिंडोली या भागात आयडीया कंपनीत ही महिला नोकरी करत होती. तिथे मुकेश गुप्ता हे नाव धारण केलेला मोहम्मद यायचा. आपलं लग्न झालेलं नाही ही बाब त्याने या महिलेला सांगितली होती. जवळपास रोजच तिथे मुकेश उर्फ मोहम्मद येत असल्याने या २० वर्षांच्या तरुणीची आणि त्याची चांगली ओळख झाली त्याचप्रमाणे मैत्रीही झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि या दोघांनी मंदिरात लग्न केलं.

लग्नानंतर मुकेश आणि त्या मुलीला एक मुलगा झाला. मुकेश उर्फ मोहम्मदने आपण रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगितलं होतं. तसंच तुमच्या मुलीला रेल्वेत नोकरी लावतो असं सांगून तिच्या कुटुंबाकडून १२ लाख रुपयेही घेतले होते. २०२१ मध्ये या मुकेशच्या दुसऱ्या पत्नीला म्हणजेच या मुलीला मुकेश हिंदू नसून मुस्लिम आहे हे समजलं तसंच त्याचं आधीच एक लग्न झालं आहे आणि त्याला पाच मुलं आहेत ही बाबही कळली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि या महिलेने सूरतच्या डिंडोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ज्यानंतर मुकेश उर्फ मोहम्मदला अटक करण्यात आली. या प्रकरणात आता सूरत न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

Story img Loader