उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला फारसा वेळ उरलेला नाही. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. सपा, काँग्रेस आणि बसपा हे सत्ताधारी पक्ष भाजपावर सातत्याने निशाणा साधण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे भाजपाही आपण केलेल्या कामांबद्दल सांगून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एका वृत्त वाहिनीवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत आणि भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी काँग्रेस प्रवक्ते जरा जास्तच आक्रमक झाले आणि त्यांनी नरेंद्र मोदींचे नाव काय, अशी विचारणा सुरू केली. इतकंच नाही तर या वादात त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचा धर्मही विचारला.
चर्चा सुरू असताना संबित पात्रा यांनी इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांची नावं घेत राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले, “ज्याचे आजोबा फिरोज खान आणि ज्याची आई अँटोनियो माइनो आहे, तो फक्त भारतात हिंदूंवर प्रवचन देऊ शकतो. तो सौदी अरेबियात जाऊन इस्लामचा प्रचार करू शकतो का?, ते घरवापसी नाही करणार.” संबित पात्रा यांच्या या टीकेवर काँग्रेसचे प्रवक्ते आक्रमक झाले आणि म्हणाले, “असं आहे संबित पात्रा, तुम्ही जरा तुमच्या आजोबा आणि वडिलांबद्दल सांगता का. नरेंद्र मोदींचे आजोबा कोण आहेत तेही सांगा. अमित शहांच्या वडिलांचे नाव सांगा. नरेंद्र मोदींचे वडील काय करायचे ते सांगा.”
यावर उत्तर देताना संबित पात्रा म्हणाले, “हे योग्य नाही, मला बोलू द्या. जो माणूस माझ्या धर्माबद्दल उघडपणे बोलतो, जो माझ्या धर्माचा अपमान करतो.” त्यांच्या बोलण्यावर अँकर म्हणाले, “काँग्रेस तुम्हाला तुमच्या वडील आणि आजोबांचं नाव विचारतंय. यावर चिडलेले संबित पात्रा म्हणाले, “हे मूर्ख कोण आहेत, ते त्यांना वाट्टेल ते बोलत राहतील आणि आम्ही उत्तर देत राहू. आपण मूर्खांना उत्तर देणे थांबवूया. ज्याच्या आजोबांचे नाव फिरोज खान आणि आईचे नाव अँटोनियो माइनो आहे, ते आमच्या धर्माबद्दल सतत काहीही बोलतात.” तर संबित पात्रा यांच्या बोलण्यावर चिडलेल्या काँग्रेस प्रवक्त्याने पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडिओ दाखवत नरेंद्र मोदींनी हिंदूंच्या विरोधात सर्वात मोठी सुपारी घेतल्याचे सांगितले.
भाजपा नेत्यावर निशाणा साधत काँग्रेसचे प्रवक्ते पुढे म्हणाले, “जे लोक राहुल गांधींबद्दल उलट-सुलट बोलतात, ते वरुण गांधींबद्दल गप्प बसतात. राहुल गांधींवर आरोप करून तुम्ही सतत तुमची बेरोजगारी लपवत आहात. अमित शहा हिंदू आहेत की जैन आहेत ते आधी सांगा. आमच्या हिंदू मंदिरांचे उद्घाटन तुम्ही अमित शहांच्या हस्ते करायला लावाल का?”
यावर संबित पात्रा म्हणाले, “हा आमच्या गृहमंत्र्यांवर वैयक्तिक हल्ला आहे. त्यांच्यावर चुकीचा आरोप करण्यात आला आहे, त्यांनी आपण हिंदू असल्याचा खुलासा केला आहे. जरी ते जैन असते तर एवढा द्वेष का? जैन आणि हिंदू यांच्यात फरक नाही,” असं ते म्हणाले.