राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) प्रमुख नरेंद्र मोदी यांनी काल (९ जून) तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर एकूण ७२ खासदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये केरळमधील भाजपाचे पहिले आणि एकमेव खासदार सुरेश गोपी यांचादेखील समावेश आहे. गोपी यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता ते मंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे. शपथविधी समारंभानंतर सुरेश गोपी यांनी नवी दिल्लीत एका मल्याळम वृत्तवाहिनीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी मोदींकडे किंवा पक्षाकडे मंत्रीपद मागितलं नव्हतं. मला आशा आहे की, ते लोक (एनडीए) लवकरच मला पदमुक्त करतील.
यावेळी सुरेश गोपी यांना मंत्रीपद सोडण्याचं कारण विचारल्यावर ते म्हणाले, “मी काही चित्रपट साईन केले आहेत आणि मला ते करायचे आहेत. मी माझा मतदारसंघ त्रिशूरचा खासदार म्हणून काम करत राहणार आहे.” सुरेश गोपी हे त्रिशूर लोकसभेतून खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते केरळमधील भाजपाचे पहिले खासदार आहेत. त्रिशूरमध्ये त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा ७४,६८६ मतांनी पराभव केला आहे.
सुरेश गोपी म्हणाले, “मला केवळ खासदार म्हणून काम करत राहायचं आहे. मी त्यांच्याकडे (पक्षश्रेष्ठींकडे) काहीच मागितलं नव्हतं. मी त्यांना म्हटलं होतं की मला या पदाची आवश्यकता नाही. मला वाटतं की लवकरच पदमुक्त होईन. मात्र त्रिशूरमधील मतदारांचं मी नुकसान होऊ देणार नाही. त्यांच्यासाठी आणि मतदारसंघासाठी मी काम करत राहीन. माझ्या मतदारांनाही याची कल्पना आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की मी त्यांच्यासाठी खूप चांगलं काम करेन आणि त्यांनाही याची कल्पना आहे. म्हणूनच तर त्यांनी मला त्यांची मौल्यवान मतं दिली आहेत. मात्र मला मंत्रीपद सांभाळता येणार नाही. कारण कोणत्याही परिस्थितीत मला माझे चित्रपट करायचे आहेत.”
सुरेश गोपी यांनी त्रिशूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. गेल्या वर्षी या मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळवला होता. मात्र यंदा सुरेश गोपी यांनी त्रिशूरमध्ये काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला धूळ चारली आहे. लोकसभेवर निवडून जाण्यापूर्वी सुरेश गोपी राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. २०१६ ते २०२२ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते.
सुरेश गोपी यांचं घुमजाव
दरम्यान, सुरेश गोपी यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केलं आहे. त्यांनी काही वेळापूर्वी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मी मोदी सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चुकीची बातमी काही माध्यमांनी दिली आहे. मात्र या बातम्या चुकीच्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहोत.
हे ही वाचा >> Modi 3.0: मोदींच्या शपथविधीवर शेअर मार्केट खूश; सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीचाही विक्रमी उच्चांक!
चित्रपटांना प्राथमिकता
सुरेश गोपी हे मुळचे केरळमधील अलप्पुझा येथील रहिवासी आहेत. कोल्लम येथून त्यांनी पदव्युत्तर पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यांनी बालवयापासूनच मल्याळम चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या कलियाट्टम या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच ते गेल्या अनेक वर्षांपासून काही टीव्ही शो होस्ट करत आहेत. आता केंद्रीय मंत्रिपदापेक्षा त्यांनी चित्रपटांना प्राथमिकता दिली आहे.