लोकसभेमध्ये गुरुवारी दुपारी सादर करण्यात येणाऱ्या २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीच्या रेल्वे अर्थसंकल्पावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी अखेरचा हात फिरवला.
सुरेश प्रभू यंदा दुसऱ्यांदा रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वर्षी त्यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना एकही नव्या रेल्वेची घोषणा केली नव्हती. रेल्वेची आर्थिक स्थिती आणि पायाभूत सुविधा सुधारण्याकडे त्यांनी लक्ष दिले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात ते कोणत्या नव्या रेल्वेची घोषणा करतात, याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
रेल्वेमध्ये महिलांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्यात यावे, त्यासाठी स्थानके आणि रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. त्याचबरोबर रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारीही रेल्वेडब्यांमध्ये तैनात करण्यात यावेत, अशी मागणी अनेक महिलांनी केली आहे. अर्थसंकल्पात त्यासाठी तरतुद केली जाते का, हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.