आकाश क्षेपणास्त्र प्रकल्प सुरू झाल्यापासून तीन दशकांनी ही क्षेपणास्त्रे आता लष्करात दाखल करण्यात आली आहेत. स्वदेशी बनावटीची ही क्षेपणास्त्रे स्वनातीत असून २५ किमीच्या टप्प्यात शत्रूची हेलिकॉप्टर्स, विमाने, निर्मनुष्य विमाने पाडण्याची त्यांची क्षमता आहे.
संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओ या संस्थेने आकाश क्षेपणास्त्राची निर्मिती केलेली असून, त्यामुळे लष्कराची हवाई संरक्षण सिद्धता वाढली आहे. असे असले तरी या क्षेपणास्त्रांच्या कामास काही प्रमाणात विलंब झाला आहे.
लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी ही क्षेपणास्त्रे देशाला अर्पण करण्याच्या कार्यक्रमात सांगितले, की आपल्या मालमत्तांचे संरक्षण करण्याचे काम ही क्षेपणास्त्रे करतील. आकाश क्षेपणास्त्रे ही स्वदेशीकरणाच्या दिशेने पडलेले पाऊल आहे. हवाई सुरक्षेच्या व्यवस्थापन प्रणालीत काही बदल करण्याचा विचार आहे.
आकाश क्षेपणास्त्र हे स्वदेशी असून जमिनीवरून हवेत मारा करणारे लघु पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. २५ कि.मी. अंतरावरील व २० कि.मी. उंचीवरील विमाने, हेलिकॉप्टर्स व निर्मनुष्य विमाने पाडण्याची त्याची क्षमता आहे. सर्व प्रकारच्या हवामानात ही क्षेपणास्त्रे वापरता येतात. आकाश क्षेपणास्त्रे पश्चिमी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केली जात आहेत, त्यांना लक्ष्य शोधण्यासाठी अत्याधुनिक रडार्सची मदत मिळणार आहे.
लष्कराने मागणी नोंदवलेल्या आकाश क्षेपणास्त्रांची किंमत १९५०० कोटी रुपये आहे, त्यातील पहिला टप्पा जून-जुलैपर्यंत मिळेल, तर दुसरा टप्पा २०१६च्या अखेरीस मिळेल असे सुहाग यांनी सांगितले. १९८४ मध्ये भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेने आकाश क्षेपणास्त्र निर्मितीस सुरुवात केली होती.