वारंवार होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन, सीमेपलीकडील दहशतवाद आणि घुसघोरी यांना आटोक्यात आणण्यासाठी सर्जिकल स्ट्राइक किंवा लक्ष्यभेदी हल्ला हा एक चांगला उपाय असल्याचे भारतीय लष्कराला वाटते. भारतीय लष्कराने ६२ पानांची पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यामध्ये दहशतवादाला आटोक्यात आणण्यासाठी काय करता येऊ शकते याबाबत चर्चा करण्यात आली आहे. संरक्षण खात्याच्या उच्चपदस्थांनी ही पुस्तिका तयार केली आहे. जून २०१५ मध्ये म्यानमारच्या दहशतवादी तळावर सर्जिकल स्ट्राइक करण्यात आली होती. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये देखील सर्जिकल स्ट्राइक करण्यात आली होती.
या सर्जिकल स्ट्राइकमध्ये किमान ४०-५० दहशतवादी ठार करण्यात आल्याचे लष्कराने सांगितले होते. दहशतवादाला आटोक्यात ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपायांपैकी सर्जिकल स्ट्राइक प्रभावी असल्याचे दिसून आले आहे असे पुस्तिकेत म्हटले आहे. मोदी सरकार लष्कराच्या पाठीशी उभी राहिले आणि त्यांनी या हल्ल्यासाठी परवानगी दिली. राजकीय नेतृत्व आणि लष्करी नेतृत्वाचा पवित्रा सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर बदलला आहे. यामुळे सैनिकांचे मनोबल वाढले आहे असे देखील या पुस्तिकेत म्हटले आहे.
भारताने जानेवारी २०१७ मध्ये पाकिस्तानला शांततापूर्ण मार्गाने चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु त्यांनी या प्रस्तावाला योग्य प्रतिसाद दिला नाही. असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले. भारताने शांततेचा प्रस्ताव वारंवार दिला परंतु इस्लामाबादने प्रस्तावाचा सन्मान केला नाही असे ते म्हणाले. जर पाकिस्तानमधून दहशतवादी येणार असतील तर त्यांचे तळ आम्ही तेथे जाऊन उद्ध्वस्त करू असे ते म्हणाले होते. सर्जिकल स्ट्राइकनंतर भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे असे तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटले होते. भारताने पाकिस्तानच्या भूमीवर सर्जिकल स्ट्राइक केलीच नाही असे पाकिस्तानने म्हटले होते.