पीटीआय, थिरुअनंतपुरम
सुर्यनेल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी ठरलेला फरारी आरोपी धर्मराजन याला केरळ पोलिसांनी कर्नाटकातील सागर येथे शुक्रवारी अटक केली. या प्रकरणी होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यसभेचे उपसभापती पी.जे.कुरियन हे अडचणीत आले आहेत.
सतरा वर्षांपूर्वीच्या या बलात्कार प्रकरणातील धर्मराजन हा दोषी ठरलेला तिसरा आरोपी आहे. जामिनावर सुटल्यानंतर तो फरारी झाला होता. कुरियन यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे त्याने काही दिवसांपूर्वी मल्याळी दूरचित्रवाहिनीशी बोलताना सांगितले होते. त्याच्या या मुलाखतीनंतर केरळ पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. आपण म्हैसूरनजीकच्या ठिकाणाहून बोलत असल्याचे धर्मराजनने बोलण्याच्या ओघात सांगितले होते. त्याआधारे पोलिसांनी तपास केला.
इडुक्की जिल्ह्यातील सुर्यनेल्ली येथून एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून १९९६ मध्ये खटला दाखल करण्यात आला होता. विशेष न्यायालयाने या खटल्याचा निकाल २००२ मध्ये दिला होता. धर्मराजन याला जन्मठेपेची, तर इतर ३५ जणांना विविध कालावधीच्या तुरुंगवासाच्या शिक्षा झाल्या होत्या. या निकालास उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर ३५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. धर्मराजन याच्या जन्मठेपेची शिक्षा कमी करून ती पाच वर्षांच्या तुरुंगावासापुरती मर्यादित करण्यात आली. त्याच वर्षी त्याने या शिक्षेला आव्हान देण्यासाठी जामीन मिळवला. तेव्हापासून तो फरारी होता. त्याने दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुरियन यांचा उल्लेख केल्याने यासंदर्भात नव्याने वादंग निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा