संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेची बाजू अत्यंत आक्रमकतेने मांडणाऱ्या अमेरिकेच्या दूत सुसान राइस यांची ओबामा प्रशासनाच्या राष्ट्रीय संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुसान या भारत-अमेरिका मैत्रीच्या खंद्या समर्थक मानल्या जातात.
सुसान राइस या ४८ वर्षांच्या असून येत्या जुलैमध्ये त्या आपल्या पदाची सूत्रे हाती घेतील. अध्यक्ष बराक ओबामा यांनी सुसान यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना त्या ‘आदर्श आणि अनुकरणीय’ प्रशासकीय अधिकारी असल्याचे म्हटले आहे.
सुसान यांची वैशिष्टय़े –
सुसान राइस यांनी संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेचे प्रतिनिधित्व करताना अत्यंत हिरीरीने आणि आक्रमकपणे आपली बाजू मांडली आहे. इराण आणि उत्तर कोरियावर आर्थिक र्निबध लादण्याच्या निर्णयात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. मावळते संरक्षण सल्लागार डॉनिलॉन यांच्या जागी करण्यात आलेली सुसान यांची नियुक्ती हा ओबामा प्रशासनाचा उत्तम निर्णय आहे, आशिया खंडाकडे राजकीय, आर्थिक आणि सामरिकदृष्टय़ा ते किती गांभीर्याने पाहातात हेच यातून स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया आशिया सोसायटीच्या जागतिक धोरण आणि कार्यक्रम विभागाच्या उपाध्यक्षा दिमॅगिओ यांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया –
ओबामा प्रशासनाने केलेल्या या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत केले गेले असल्याची माहिती व्हाइट हाऊसचे प्रसारमाध्यम विषयक सचिव जॉन कार्ने यांनी दिली. सुसान राइस यांना अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री करण्याचा ओबामा यांचा मानस होता, मात्र या निवडीसाठी सिनेटची मान्यता आवश्यक असल्याने तसेच रिपब्लिक पक्षाच्या खासदारांचा या निवडीस विरोध असल्याने राइस यांची परराष्ट्रमंत्रीपदी (सेक्रेटरी ऑफ स्टेटस्) वर्णी लागली नव्हती.
सुसान राइस या बराक ओबामा यांच्या निकटवर्तीय आणि विश्वासातल्या मानल्या जातात. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण निर्मितीचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांपैकी सुसान या सर्वात ज्येष्ठ असून न्याय आणि मानवी प्रतिष्ठा यांच्या त्या समर्थक मानल्या जातात.
दरम्यान पुलित्झर पारितोषिक विजेत्या साहित्यिक समंथा पॉवर यांची संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेच्या दूत म्हणून निवड करण्यात आली आहे.