सुशांत आत्महत्या करणं शक्य नाही. यासंदर्भात काहीतरी नक्कीच चुकीचं घडल्याची शंका आम्हाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. मात्र महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे आम्ही मागणी करतोय की केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून या प्रकरणाची न्यायलयीन चौकशी केली जावी, अशी मागणी अभिनेता सुशांस सिंह राजपूत याच्या नातेवाईकांनी केली आहे. मूळचा बिहारमधील पाटण्याच्या असणाऱ्या सुशांतने रविवारी मुंबईतील राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. अतिशय हुशार, सुस्वभावी आणि हसतमुख असणाऱ्या सुशांतच्या आत्महत्येने मनोरंजन विश्वाला हादरवून सोडले. यशाच्या शिखरावर असताना आयुष्य संपवण्याचा निर्णय त्याने का घेतला? याचीच चर्चा सध्या सुरू आहे. अशातच आता त्याच्या कुटुंबाने या आत्महत्येसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सुशांतच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर पाटण्यामधील त्याच्या राहत्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली. यावेळी सुशांतच्या मामांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सुशांत सारखा मुलगा आत्महत्या करु शकत नाही असं म्हणत या घटनेची चौकशी केली जावी अशी मागणी केली. “अतिशय हुशार, देशाबद्दल, समाजाबद्दल प्रेम असणारा कलाकार होता होता. असा तरुण आत्महत्या करु शकत नाही. आम्ही सर्व वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मागणी करतो की सरकारने या प्रकरणाची न्यायलयीन चौकशी करावी. त्याचे देशावर आणि समाजावर प्रेम होते. त्याचं कामही उत्तम सुरु होतं. महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास नाही. मी गृहमंत्र्यांकडे मागणी करतो की याची केंद्रीय संस्थेच्या माध्यमातून न्यायालयीन चौकशी केली जावी,” असं सुशांतचे मामा म्हणाले.

नक्की वाचा >>“सुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाइलमध्ये असतील तर…”; महाराष्ट्र पोलिसांचा इशारा

“एक तरुण जो कालपर्यंत रिअॅलिटी शोमध्ये नाचत होता तो अचानक असा निर्णय घेईल का? नाही घेणार. रोज तो त्याच्या वडीलांशी बोलायचा, कुटुंबाशी बोलायाचा. कुठे ना कुठे यासंदर्भात आम्हाला संक्षय आहे. यामध्ये काहीतरी चुकीचं असल्यासारखं आम्हाला वाटत आहे. म्हणूनच आम्ही ही मागणी करत आहोत. पंतप्रधान मोदींकडे मी मागणी करतो की देशाने एक राष्ट्रवादी पुत्र गमावला आहे. तो देशासाठी आणि तुमच्या मदतीसाठीही कायम उभा रहायचा. मी मागणी करतो की या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशी केली जावी,” अशी विनंती सुशांतच्या मामांनी केली आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘छिछोरे’ चित्रपटात नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाच्या वडिलांची भूमिका त्याने साकारली. निराशा, अपयश यामुळे आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय चुकीचा आहे हा संदेश चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुशांतनेच आपले आयुष्य त्या मार्गाने संपवले ही त्याच्या चाहत्यांसाठी अनाकलनीय गोष्ट आहे.