तेलगु देशम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी येथील आंध्र भवनमध्ये सुरू केलेले बेमुदत उपोषण हा अजबच प्रकार असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे. राज्य अतिथिगृहाच्या संकुलात माजी मुख्यमंत्री उपोषणाला बसण्याचा हा पहिलाच प्रकार असावा, असेही शिंदे म्हणाले.
आंध्र भवन संकुलात उपोषणाला बसलेल्या नायडू यांना तेथून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार हस्तक्षेप करणार का, असे विचारले असता शिंदे म्हणाले की, आंदोलन करण्याचा हा अजबच प्रकार आहे. उपोषणाला बसण्यासाठी कोणीतरी राज्य अतिथिगृहाचा वापर करीत असल्याचे आपण प्रथम पाहात आहोत, असे गृहमंत्री म्हणाले.
उपोषणाला बसण्याच्या जागेवरून आंध्र प्रदेश सरकार आणि नायडू यांच्यात सुरू असलेल्या तिढय़ात जाण्यास नकार देऊन शिंदे म्हणाले की, बेकायदा घुसखोरी केल्याची तक्रार राज्य सरकारने न्यायालयात करावी. न्यायालयाचा आदेश आल्यास आम्ही त्याबाबत मदत करू शकतो, असेही ते म्हणाले.
स्वतंत्र तेलंगणा राज्यनिर्मितीला आमचा पाठिंबा असल्याचे तेलगु देशम पक्षाने केंद्र सरकारला स्पष्ट कळविले असून त्या मताचा योग्य विचार केला जाईल, असे सांगून शिंदे यांनी नायडू यांना उपोषण मागे घेऊन आंध्र प्रदेशात परतण्याचे आवाहन केले. आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या निर्णयाच्या विरोधात नायडू सोमवारपासून उपोषणाला बसले आहेत.
आंध्र प्रदेशचे निवासी आयुक्त शशांक गोयल यांनी नायडू यांच्यावर नोटीस बजावली असून उपोषण बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अतिथिगृहाच्या संकुलात केवळ पत्रकार परिषद घेण्याची मुभा देण्यात आली होती, असेही गोयल यांनी म्हटले आहे.

Story img Loader