मतदारांना लॅपटॉप, रंगीत दूरदर्शन संच आणि धोतर-साडी देण्याचे आश्वासन दिल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला असून निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मतदारांना आमिष दाखविल्याप्रकरणी मोदी यांच्याविरुद्ध भाबुआ पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला असल्याचे कैमूर जिल्ह्य़ाच्या पोलीस अधीक्षक हरप्रित कौर यांनी सांगितले. भाजपचे उमेदवार आनंद भूषण पांडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मोदी यांनी वरील आश्वासने दिली.
या सभेच्या व्हिडीओ फुटेजच्या आधारावर मोदी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे हरप्रित कौर यांनी सांगितले. बिहारमध्ये आमचे सरकार आल्यास आम्ही ५० हजार युवक-युवतींना लॅपटॉप देऊ, असे आपण सांगितले त्यामागे पक्षाची नागरिकांबाबत भूमिका काय आहे हे स्पष्ट केले, त्यामुळे त्यामध्ये गैर काहीही नाही, असे मोदी म्हणाले.