श्रीनगरच्या बेमिना भागात बुधवारी हल्ला करणारे दहशतवादीे पाकिस्तानी असावेत, असा संशय केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत व्यक्त केला. या हल्ल्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. हल्ल्यात शहीद झालेल्या पाच जवानांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिली जात असताना अनुपस्थित राहिल्याबद्दल विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.
 पोलीस पब्लिक शाळेच्या कुंपणातील फटीतून शिरून क्रिकेटपटूंच्या वेशातील दोन दहशतवादी पटांगणात पोहोचले. तिथे उपस्थित तरुणांमध्ये घुसले आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. या गोळीबारात पाच जवान शहीद, तर सहा जवान आणि चार नागरिकही जखमी झाले. या घटनेच्या वेळी ७३ बटालियनचे ५० जवान तिथे उपस्थित होते, अशी माहिती शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिली. या हल्ल्यात ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपाशी सापडलेल्या दोन डायऱ्यांमधील क्रमांक पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. शिवाय त्यांच्यापाशी त्वचेवर लावायच्या बेटनोव्हेट मलमाच्या टय़ूबवर कराची ३५, डॉकयार्ड, ग्लॅक्सो स्मिथक्लाइन, पाकिस्तान असा पत्ता आहे. टय़ूबवरील मजकूर उर्दू भाषेत असून डायरीतील क्रमांक पाकिस्तानमधील असावेत, असा संशय आहे. मृत दहशतवाद्यांपाशी दोन एके-४७ रायफल्स, दोन पिस्तूल, चार ग्रेनेड आणि पाच मॅगझिन्स सापडल्याचे त्यांनी सांगितले. अजमल कसाब आणि अफझल गुरू यांच्यासारख्या दहशतवाद्यांना फाशी दिल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होण्याची भीती वर्तविण्यात आली होती, असे शिंदे यांनी नमूद केले.
मात्र, हल्लेखोर पाकिस्तानचे होते असे आपण म्हटलेले नाही, असे शिंदे यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. आपण अतिरेक्यांना केवळ विदेशी म्हटलेले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या हल्ल्याची जबाबदारी हिजबूल मुजाहिद्दीनच्या प्रतिनिधीने घेतली असली तरी या दाव्याची सत्यता अजून पडताळून पाहण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

शिंदेंकडून पुन्हा गफलत!
पाच परिच्छेदांचे निवेदन शिंदे पुन्हा वाचू लागले तेव्हा भाजपच्या काही सदस्यांनी त्यांची चूक लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला, तर अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्यासह शिंदे यांचे सहकारी मंत्रीही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले, पण त्याकडे शिंदेंचे लक्ष नव्हते. निवेदनाचा निम्मा भाग दुसऱ्यांदा वाचून झाल्यावर लोकसभेच्या एका अधिकाऱ्याने त्यांना ही गफलत लक्षात आणून दिली. तेव्हा त्यांनी निवेदन वाचायचे थांबविले.

Story img Loader