Sushilkumar Shinde : मंत्रिपदाच्या कारकि‍र्दीत जम्मू काश्मीरला भेट देताना मी घाबरलो होतो, अशी कबुली खुद्द तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या Five Decades in Politics या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी गृहमंत्री होण्यापूर्वी शिक्षणतज्ज्ञ विजय धर यांना भेटत असे. त्यांच्याकडून मी सल्ला घ्यायचो. त्यांनी त्यावेळी मला इकडे तिकडे न फिरता श्रीनगरच्या लाल चौकात भेट द्यायला सांगितली. तिथल्या लोकांना भेटून दल सरोवराभोवती फिरण्याचा सल्ला दिला होता. यामुळे माझी चांगली प्रसिद्धी झाली. लोकांना वाटलं की एक गृहमंत्री इथं बिनधास्त जातो. पण लोकांना काय माहीत की मी किती घाबरलो होतो. मी तुम्हाला हसवण्यासाठी हे सांगितले, पण एक माजी पोलीस असे बोलू शकत नाही”, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या तुफान चर्चा सुरू आहे.

२०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारताचे गृहमंत्री म्हणून सुशीलकुमार यांची नियुक्ती केली होती. पी. चिदंबरम यांच्यानंतर गृहमंत्रीपदाचा कार्यभार सुशीलकुमार शिंदे यांनी सांभाळला होता. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात श्रीनगरच्या लाल चौकात खरेदी केली होती. आपल्या कुटुंबासाठी खरेदी करण्यासाठी ते जम्मू काश्मीरच्या राजधानीतील काश्मीर आर्टस शोरुममध्ये आले होते. त्यानंतर त्यांच्याबरोबर ओमर अब्दुल्लासुद्धा होते.

या भेटीदरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी श्रीनगर येथील क्लॉक टॉवरलाही भेट दिली होती. ‘घंटा घर’ म्हणून ओळखला जाणारा क्लॉक टॉवर १९७८ मध्ये माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या विनंतीवरून बांधण्यात आला होता. २००८ आणि २०१० मध्ये जेव्हा काश्मीर खोऱ्यात निदर्शने झाली, तेव्हा टॉवरवर पाकिस्तानी ध्वज फडकवण्यात आले होते.

शिंदे यांच्या कार्यकाळात २६/११चा मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाब आणि संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफझल गुरू आणि २०१२ च्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushilkumar shinde said i was scared to visit jammu kashmir in my tenure sgk