लोकसभेचे कामकाज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या इशाऱ्यावर चालते. त्यांच्या चिथावणीवरून गोंधळ घालून काँग्रेसचे सदस्य विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलू देत नाही, असे गंभीर आरोप आज लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केले. मनमोहन सिंग सरकारचा संसदीय परंपरांवरील विश्वास संपुष्टात आला असून व्यवस्था ठप्प झाली आहे. आता यापुढे लोकसभा अध्यक्ष किंवा संसदीय कामकाज मंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकींना भारतीय जनता पक्ष उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका स्वराज यांनी घेतली.
लोकसभेत सरकारचे वित्तीय कामकाज पूर्ण झाल्यानंतर भाजप मुख्यालयात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज यांनी  सोनिया गांधी यांच्यावर आरोपांची गंभीर तोफ डागली.
सोनिया गांधी यांना संसदीय परंपरांमध्ये विश्वास नाही. सर्वपक्षीय बैठकीत कुठलाही निर्णय झाला तरी संसदेत सोनिया गांधी यांना हवे तेच घडते. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष मीराकुमार आणि संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी बोलविलेल्या कोणत्याही बैठकीला भाजप उपस्थित राहणार नाही, असे स्वराज यांनी जाहीर केले.
सरकार ज्या पद्धतीने विरोधी पक्षांशी वागत आहे, त्यावरून या सरकारची गच्छंतीची वेळ आली आहे हे स्पष्ट दिसत आहे, असे स्वराज म्हणाल्या.
लोकसभेत आपल्या भाषणादरम्यान व्यत्यय आणण्यासाठी सोनियांनीच काँग्रेसच्या सदस्यांना चिथावल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी आज आपल्याला बोलण्यापासून रोखले आणि सभागृहात मीराकुमार यांनाही सोनिया गांधीच चिथावतात, असा आरोप स्वराज यांनी केला.
संसद केवळ सोनिया गांधींच्या इशाऱ्यावरच काम करेल काय? विरोधी पक्षांसाठी कोणतेही स्थान नसलेली ही कोणती लोकशाही आहे, असे सवाल स्वराज यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा