ललित मोदी प्रकरणात कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत, त्याचे गुन्हेगार कॉंग्रेसचे नेतेच आहेत, अशी परतफेड परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी लोकसभेत केली. या प्रकरणात मी कोणतीही चूक केलेली नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. खर्गे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी कॉंग्रेसच्या काळात भोपाळ वायू दुर्घटनेतील आरोपी वॉरन अॅंडरसन याला देशातून लपून छपून पळून जाण्यात कशी मदत केली गेली, याचा दाखला कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष अर्जुनसिंह यांच्या आत्मचरित्राच्या दाखल्याने दिला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे मित्र अदिल शहरियार ३५ वर्षे अमेरिकेतील तुरुंगात होते. त्यांना तुरुंगातून सोडण्याच्या बदल्यात वॉरन अॅंडरसन यांना लपून छपून भारतातून बाहेर नेण्यात आले, असा गंभीर आरोपही त्यांनी गांधी घराण्यावर केला.
सुषमा स्वराज म्हणाल्या, ललित मोदींविरोधात कॉंग्रेसच्या काळात सक्तवसुली संचालनालयाने तपासात कोणतीच प्रगती न केल्याने उच्च न्यायालयाने त्यांचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात याचिका का करण्यात आली नाही, हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याऐवजी मीच तुम्हाला विचारला पाहिजे. कॉंग्रेसच्याच काळात ललित मोदींना इंग्लंडमध्ये ‘रेसिडेन्सी परमिट’ देण्यात आले होते. त्यावेळी त्याला का आक्षेप घेण्यात आला नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.
ललित मोदींना भारतात परत नेण्यासाठी प्रत्यार्पण कराराचा वापर करा, असे इंग्लंडने देशात कॉंग्रेसचेच सरकार असताना सुचविले होती. मात्र, त्याला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही, याकडे लक्ष वेधून त्या म्हणाल्या, ललित मोदींविरोधातील पासपोर्ट खटल्यात माझे पती वकील नव्हते. माझी मुलगी त्या खटल्यातील ललित मोदी यांचे मुख्य वकील पराग त्रिपाठी यांची नवव्या क्रमांकावरील सहायक म्हणून काम बघत होती आणि नवव्या क्रमांकावरील सहायकाला काहीही पैसे मिळत नाहीत, हे सर्वांना माहिती आहे.

Story img Loader