भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्या संकेतस्थळावर विकणाऱ्या अॅमेझॉनला केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. अॅमेझॉनने तात्काळ या उत्पादनांची विक्री बंद करावी आणि बिनशर्त माफी मागावी. अन्यथा अॅमेझॉनच्या एकाही अधिकाऱ्याला भारतीय व्हिसा दिला जाणार नाही. तसेच याअगोदर देण्यात आलेले व्हिसाही रद्द करण्यात येतील, अशी तंबीच स्वराज यांनी अॅमेझॉनला दिली आहे. याशिवाय, स्वराज यांनी कॅनडातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांनाही ही गोष्ट अॅमेझॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नेण्याचे आदेश दिले आहेत. अॅमेझॉन कॅनडाच्या वेबसाईटवर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्यांची विक्री होत असल्याने तेथील भारतीयांनी त्याला विरोध केला होता. तसेच अॅमेझॉनविरोधात याचिकाही दाखल केली होती. दरम्यान, या सगळ्या घडामोडींनंतर अॅमेझॉन कॅनडाने आपल्या संकेतस्थळावरून संबंधित पेज हटवले आहे. यापूर्वीही अॅमेझॉनकडून अशाप्रकारचा प्रमाद घडला होता. गेल्यावर्षी अॅमेझॉनने भारतीय देवी- देवतांची चित्र छापून काही वस्तूंची विक्री केली होती. यावरून बराच वादंगही निर्माण झाला होता. त्यावेळी #BoycottAmazon अशा हॅशटॅगने सोशल मिडीयावर आंदोलनही छेडण्यात आले होते.

Story img Loader