पाकिस्तानने दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणे आणि भारतद्वेषाचा प्रचार करणे सुरूच ठेवले असून, देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील, असे सरकारने आज राज्यसभेत सांगितले.
सिमला करार आणि लाहोर घोषणापत्र यात मान्य करण्यात आल्यानुसार शांततापूर्ण व सहकार्याचे संबंध स्थापन करण्यास, तसेच दोन्ही देशांमधील सर्व प्रलंबित मुद्दे परस्पर संवादातून सोडवण्यास आपण बांधील असल्याचे भारताने पाकिस्तानला वारंवार सांगितले आहे. तरीही पाकिस्तानची दहशतवादाला मदत आणि भारताविरुद्ध विद्वेषी प्रचार अखंडित सुरूच आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पावित्र्य राखावे, तसेच दहशतवादी गटांना आपल्या भूमीवरून भारतविरोधी कारवाया करण्यास रोखण्याच्या आपल्या बांधीलकीशी इमान राखावे, असे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतविरोधी प्रचार आणि प्रसार करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांची सरकारला कल्पना असून, सर्व भारतीयांची सुरक्षितता निश्चित करण्याकरिता देशाचे सार्वभौमत्व आणि भौगोलिक अखंडता यांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही आवश्यक ते प्रयत्न करू, अशी हमी स्वराज यांनी दिली.
‘आण्विक शस्त्रांचा मानवतेवरील परिणाम’ या विषयावर गेल्या ८ व ९ डिसेंबर रोजी झालेल्या व्हिएन्ना परिषदेत अधिकृतरीत्या सहभागी होऊन भारताने आण्विक शस्त्रांच्या वापरावर वाढीव र्निबध आणण्यासाठीचे धोरण तसेच कायदेशीर उपाय याबाबत संयुक्तपणे प्रयत्न करण्याच्या आवश्यतेवर भर दिला, असेही सुषमा स्वराज यांनी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा