पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या आरोपांना भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सडेतोड उत्तर दिले. नवाज शरीफ यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी चार सुत्री प्रस्ताव मांडला. पण हा प्रस्ताव  सुषमा स्वराज यांनी फेटाळून लावत दोन्ही देशांत शांतता रहावी असे पाकिस्तानला वाटत असेल तर फक्त एकाच सुत्राची गरज आहे. पाकिस्तानने दहशतवाद सोडून चर्चेला बसावे, असा सणसणीत टोला सुषमा स्वराज यांनी पाकला लगावला.
त्या म्हणाल्या, नवाज शरीफ यांनी काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी काल चार सूत्रे सांगितली. पण या चार सूत्रांची गरज नाही. उभय देशांत शांतता नांदावी असे त्यांना वाटत असल्यास एकच सूत्र पुरेसे आहे. पाकने दहशतवाद सोडावा आणि चर्चेला बसावे. चर्चेतून यश मिळाले तर आम्ही सर्व मुद्दे सोडवायला तयार राहू, असे स्वराज म्हणाल्या.
स्वराज यांनी यावेळी मुंबई हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी हाफीज सईद आणि जाकीउर लखवीचाही मुद्दा उपस्थित केला. भारतात दहशतवादी कारवायांना कारणीभूत असणारे हे हल्लेखोर पाकिस्तानात आज मोकाट फिरत असल्याबद्दल स्वराज यांनी आश्चर्य व्यक्त केले. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी चालू शकत नाही, असेही स्वराज यांनी पाकला सुनावले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सुषमा स्वराज यांच्या भाषणाचे यावेळी कौतुक केले. स्वराज यांनी संयुक्त राष्ट्र संघात अतिशय उत्तमरित्या भारताचे विषय जगासमोर मांडले असून भारताच्या जागतिक योगदानाची मुद्देसूद मांडणी त्यांनी केल्याचा स्तुतीसुमनांचा वर्षाव मोदी यांनी केला.
भारताकडून पाकिस्तानमध्ये अस्थिरता पसरविण्यात येत असल्याचा आरोप नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना केला होता. काश्मीरच्या नागरिकांची तुलना थेट पॅलेस्टिनी नागरिकांशी नवाज शरीफ यांनी केली होती. पॅलेस्टिनी आणि काश्मीरी नागरिकांच्या भूमीवर परकियांची सत्ता आहे. त्यामुळे येथील जनतेला अत्याचार सहन करावे लागत आहेत. असे शरीफ म्हणाले होते. शरीफ यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना विकास स्वरूप यांनी अतिक्रमण भारताने नाही तर पाकनेच केल्याचे म्हटले. पाकिस्तानकडून नेहमी दहशतवादाचा पुरस्कार करण्यात आला आहे. त्यामुळे काश्मीर सैन्यमुक्त करणे हे उत्तर नाही तर पाक दहशतवादमुक्त करणे हे खरं उत्तर असल्याचे, स्वरुप यांनी पाकला ठणकावले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा