स्वराज यांची अपेक्षा
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात सुधारणा कार्यक्रम राबवला गेला पाहिजे, असा आग्रह परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी धरला आहे. उद्या (सोमवार) आफ्रिकी देशांची परिषद होत असून सुरक्षा मंडळाच्या स्थायी सदस्य देशांत भारत व आफ्रिका खंडाला प्रतिनिधित्व दिले जात नाही हे समजण्यासारखे नाही. भारत-आफ्रिका शिखर परिषद उद्यापासून येथे सुरू होत आहे, त्यानिमित्ताने त्या बोलत होत्या.
आफ्रिका हा मोठा खंड आहे व त्यात अनेक देशांचा समावेश आहे. भारतही मोठा देश आहे व जगातील एकषष्ठांश लोकसंख्या येथे आहे तरी आफ्रिकी देश व भारताला सुरक्षा मंडळाचे सदस्यत्व मिळत नाही ही अनाकलनीय बाब आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या सुधारणांमध्ये आफ्रिका हा मोठा खंड असून त्यांच्यातील एखाद्या देशाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रस्तावही नाही ही खेदाची बाब आहे. जगातील एकषष्ठांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारताला प्रतिनिधित्व देण्याचाही विचार केला जात नाही. १९४५ पासून एक जागतिक व्यवस्था म्हणून काम करणाऱ्या सुरक्षा मंडळाला ही बाब उणेपणा आणणारी आहे. २०१५ हे ऐतिहासिक वर्ष आहे व त्यात दक्षिण-दक्षिण सहकार्याला उत्तेजन मिळाले आहे. भारत-आफ्रिका शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला संपादक मंचाच्या बैठकीत सुषमा स्वराज बोलत होत्या.
पॅरिसमधील हवामान बदल बैठक व जागतिक व्यापार संघटनेची केनियातील डिसेंबरमध्ये होणारी मंत्री पातळीवरची बैठक आफ्रिका व भारतासाठी महत्त्वाची आहे असे त्यांनी सांगितले. आफ्रिकेत विकासाच्या नव्या संधी आहेत. तेथील अर्थव्यवस्थेची वाढ झाली पाहिजे व त्याची जागतिक अर्थव्यवस्थेशी सांगड घातली गेली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.