सत्ताधारी यूपीए हे स्वातंत्र्यानंतरचे देशातील सर्वांत भ्रष्ट सरकार असल्याचा आरोप करीत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मंगळवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या राजीनाम्याची पुन्हा एकदा मागणी केली. सातत्याने उघडकीस येणारा नवीन घोटाळा हा आधीच्या घोटाळ्यापेक्षा आणखी मोठा असल्याचे दिसते, असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर भाजपसह विरोधी पक्षांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. अध्यक्षांसमोरील जागेमध्ये येऊन सदस्यांनी सरकारविरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राज्यसभेमध्येही विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे तिथेही प्रश्नोत्तराचा तास तहकूब करण्यात आला.
लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर स्वराज यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या, सत्ताधारी पक्ष राज्य करण्यासाठी असतात आणि विरोधक हे सत्ताधाऱयांवर लक्ष ठेवण्याचे काम करतात. जनतेच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी विरोधकांची आहे. आम्ही व्यक्तिगत हितासाठी संसद बंद पाडलेली नाही. कोळसा ही काही सरकारची जहागीर नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सरकारच्या पापात आम्हाला सहभागी व्हायचे नाही, असे म्हणत स्वराज यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या सर्व सदस्यांनी सभात्याग केला.