पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये बुधवारी होणाऱ्या एका बहुभाषिक परिषदेच्या निमित्ताने भारत व पाकिस्तान या देशांच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची बोलणी होणार असून, सुषमा स्वराज या पाकिस्तानी पंतप्रधान यांनाही भेटणार आहेत.
अफगाणिस्तानवर ९ डिसेंबरला इस्लामाबादेत होणाऱ्या ‘हार्ट ऑफ एशिया’ या पाचव्या मंत्रीस्तरीय बैठकीत सहभागी होणाऱ्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज करणार असल्याचे या मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विटरवर सांगितले.
भारत व पाकिस्तान या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची रविवारी बँकॉकमध्ये दहशतवाद, जम्मू- काश्मीर व इतर द्विपक्षीय मुद्दय़ांवर चर्चा होऊन त्यांनी संवादप्रक्रिया ‘सकारात्मकरीत्या’ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन दिवसांनी दोन्ही परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची भेट होत आहे. या परिषदेच्या निमित्ताने स्वराज या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ व त्यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनाही भेटणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी सुषमा स्वराज उद्या येत असून या दौऱ्यात त्या शरीफ यांनाही भेटतील, असे सरताज अझीझ यांनी इस्लामाबादेत पत्रकारांना सांगितले. भारत-पाक दरम्यानचे संबंध काही प्रमाणात सुधारले असल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशांतील समग्र संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यावर भर देण्याबाबतच्या विविध मुद्दय़ांवर स्वराज यांच्यासोबत चर्चा करण्यात येईल, असेही अझीझ म्हणाले.
माजी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस.एम. कृष्णा हे २०१२ साली इस्लामाबादला गेले असताना दोन्ही देशांमध्ये व्हिसा उदारीकरणाचा करार झाला होता. त्यानंतर तीन वर्षांनी स्वराज यांचा दौरा होत असून या वेळी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे त्यांच्यासोबत असतील.

Story img Loader