भारताने पाकिस्तानची विनंती मान्य केली आहे. न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली म्हणून पाकिस्तान संबंधीच्या आमच्या धोरणात लगेच कोणताही बदल होणार नाही किंवा द्विपक्षीय चर्चाही सुरु होणार नाही असे असे भारताने स्पष्ट केले आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट होईल. बैठकीसाठी आम्ही मुद्देही अजून निश्चित केलेले नाहीत फक्त बैठकीसाठी होकार कळवला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकारांना सांगितले.  पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या करतारपूर साहिब गुरुद्वाराच्या दिशेने जाणारा मार्ग खुला करण्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर रवीश कुमार म्हणाले कि, गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानने याबद्दल कुठलीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याबरोबर चर्चेच्यावेळी सुषमा स्वराज हा मुद्दा त्यांच्यासमोर मांडतील असे कुमार म्हणाले.

तत्पूर्वी इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात महत्वाच्या मुद्यांवर द्विपक्षीय चर्चा सुरु करण्याची विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी संयुक्त राष्ट्रातील महसभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीचा प्रस्ताव दिला होता. ज्याला भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांती चर्चा डिसेंबर २०१५ मध्ये सुरु झाली होती. मात्र पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यानंतर ही चर्चा स्थगित करण्यात आली. आता इम्रान खान यांनी ही चर्चा पुन्हा सुरु व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी दहशतवाद, काश्मीर प्रश्न आणि एकमेकांशी संबंधित असलेले इतर मुद्दे चर्चेने सोडवले पाहिजेत अशी विनंती इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या पत्रात केल्याचे समजते आहे.