वादग्रस्त तिस्ता नदी जलवाटप करारासंदर्भात राष्ट्रीय सहमती घेण्यात येईल आणि त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी खात्री भारताने गुरुवारी बांगलादेशला दिली. त्रिपुरातील वीजनिर्मिती केंद्रातून बांगलादेशला वीजपुरवठा करण्याबाबत भारत सहकार्य करेल, अशी ग्वाहीही देण्यात आली आहे, तसेच दोन्ही देशांमध्ये व्हिसाच्या काही श्रेणींमध्ये शिथिलीकरणही करण्यात आले आहे.
परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज या सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अबूल हसन मेहमूद अली यांची भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. बांगलादेशसाठी महत्त्वाचे असलेल्या तिस्ता करार आणि भूमी सीमा करार या दोन्ही करारांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. तिस्ता कराराला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विरोध असून, २०११मध्ये त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.
गुन्हेगार हस्तांतर आणि कैद्यांची सुटका आदी मुद्दय़ांवरही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. ढाक्यामध्ये सात जणांची निर्घृण हत्या करणाऱ्या नूर हुसेन या गुन्हेगाराला ताब्यात द्यावे, अशी मागणी बांगलादेशकडून करण्यात आल्याचे स्वराज म्हणाल्या. बांगलादेशमधील १३ वर्षांखालील बालके आणि ६५ वर्षांखालील नागरिकांसाठी व्हिसा शिथिलीकरण करण्यात आल्याचे स्वराज म्हणाल्या. पुनप्र्रवेश व्हिसाची मुदत एक वर्षांहून पाच वष्रे करण्यात आली आहे.
हसिना यांना मोदींचे निमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले आहे. बांगलादेशच्या दौऱ्यावर असलेल्या सुषमा स्वराज यांनी गुरुवारी हसिना यांना मोदींनी दिलेले निमंत्रणपत्र सोपवले. दरम्यान, हसिना या लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचे समजते.
तिस्ता करारासंदर्भात राष्ट्रीय सहमती
वादग्रस्त तिस्ता नदी जलवाटप करारासंदर्भात राष्ट्रीय सहमती घेण्यात येईल आणि त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी खात्री भारताने गुरुवारी बांगलादेशला दिली.
First published on: 27-06-2014 at 02:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma talks about teesta india eases visa norms for certain categories of visitors from bangladesh