वर्धमान स्टेशनवर विश्वभारती फास्ट पॅसेंजर ट्रेनमध्ये एका संशयित दहशतवाद्यास अटक करण्यात आली असून त्याचे आयसिस व जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या संघटनांशी संबंध असल्याचे सीआयडी अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्य़ातील लाभपूर येथे राहणाऱ्या मोसिरूद्दीन उर्फ मोसी उर्फ मजनू याने आयसिस व जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश यांच्याशी इमेल, समाज माध्यम व मोबाईल संपर्क असल्याची कबुली दिली आहे. सीआयडी व एनआयए तसेच गुप्तचर खात्याने घेतलेल्या जबाबात त्याने सांगितले की, खगरागड बॉम्बस्फोटात अटक केलेला अमजद शेख याच्याशी त्याचे संबंध होते. मोसिरूद्दीन याच्याकडून तीक्ष्ण हत्यारे, एअरगन जप्त केली असून काल सायंकाळी त्याला एनआयएच्या माहितीनुसार विश्वभारती फास्ट पॅसेंजर ट्रेनमध्ये अटक करण्यात आली. बराच काळ मोसीरूद्दीनवर एनआयएने पाळत ठेवली होती. तो काही काळ तामिळनाडूतील त्रिप्पूर जिल्ह्य़ात राहत होता. तो कोलकात्यात काल परत येणार असल्याची माहिती मिळाली होती.