पीटीआय, थिरुवनंतपूरम : संयुक्त अरब अमिरातीतून (युएई) केरळमध्ये नुकत्याच परतलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा मंकीपॉक्समुळे एका दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा संशय असून या मृत्यूची कारणे तपासली जातील, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी रविवारी दिली.

या रुग्णाच्या घशातील द्रावाच्या चाचणीचा अहवाल मिळणे बाकी आहे. या तरुणाला अन्य कोणताही आजार किंवा आरोग्याची समस्या नव्हती, असे त्यांनी सांगितले. ही व्यक्ती युएईतून येथे २१ जुलै रोजी परतली, पण त्याला रुग्णालयात दाखल करण्यात विलंब का झाला, याचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंकीपॉक्सचा हा विशिष्ट विषाणू करोना विषाणूइतका घातक आणि वेगाने पसरणारा नसला आणि तुलनेत त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असले तरी, निरोगी दिसणाऱ्या या तरुणाचा मृत्यू का झाला, याची कारणे शोधली जात आहेत, असे त्या म्हणाल्या. या तरुणाचा थ्रिसूरमधील खासजी रुग्णालयात शनिवारी मृत्यू ओढवला.

Story img Loader