प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपाचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. यापूर्वी २३ ऑगस्ट रोजी त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र, सायंकाळी स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. राजा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शहरात मोठय़ा प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती.  

हेही वाचा- काँग्रेसला मोठा झटका! गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा, सदस्यत्वही सोडलं

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा पोलिसांनी राजा यांच्यावर दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये ४१ (ए) अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. फेब्रुवारी आणि एप्रिल २०२२ मध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजा यांना पीडी अॅक्ट (प्रतिबंधक अटके) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक दिवस; आज पहिल्यांदाच मावळत्या सरन्यायाधीशांचा निरोप समारंभ live बघता येणार

टी राजा सिंह यांचा स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नवर फारुकीसंदर्भात बोलतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे दिसत असल्याचे म्हटले जात आहे. हैदराबादसह देशभरातून या घटनेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच सिंह यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. दोन गटांत द्वेषभाव निर्माण करणे, धार्मिक भावना भडकावण्याचा प्रयत्न करणे, अशा भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत टी राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सांयकाळपर्यंत त्यांना जामीनावर सोडण्यात आले होते. त्यांतर आता पुन्हा त्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- उत्तर प्रदेशमध्ये लग्नस्थळी आग, होरपळून पाच जणांचा मृत्यू, सातजण जखमी

असदुद्दीन ओवैसींची भाजपावर टीका

दरम्यान, प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपानंतर टी राजा सिंह यांना भाजपाने पक्षातून निलंबित केलं आहे. तर दुसरीकडे टी राजा यांच्या विधानानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर टीका केली होती. “हैदराबादमधील शांतता भाजपाला पाहवत नाहीये. भाजपाला सामाजिक सलोखा टिकू द्यायचा नाही. मुस्लिमांना भावनिक तसेच मानसिकदृष्ट्या त्रास द्यायचा हे भाजपाचे अधिकृत धोरण आहे, असा आरोप ओवैसींनी केला होता.

Story img Loader