पीटीआय, बैरूत

‘हमास’च्या राजकीय शाखेचा प्रमुख इस्माइल हनिये याची इराणची राजधानी तेहरानमध्ये हत्या झाली आहे. ही हत्या इस्रायलने केल्याचा थेट आरोप हमास आणि इराणने केला असून याचा बदला घेण्याची भाषा सुरू केली आहे. यामुळे पश्चिम आशियातील तणावात कमालीची भर पडली असताना इस्रायल आणि अमेरिकेने या हत्येबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

इस्रायली लष्कराने मंगळवारी लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये हेजबोलाच्या कमांडरला ठार केल्याचा दावा केला होता. त्यानंतर २४ तासांच्या आत तेहरानमध्ये हनिये याची हत्या करण्यात आली आहे. इस्रायलने गाझावर हल्ला केल्यानंतर हनिये कतारमध्ये राहात होता. मंगळवारी इराणच्या अध्यक्षांच्या शपथविधी समारंभासाठी तो तेहरानला आला होता. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी, बुधवारी पहाटेच्या वेळी त्याच्या तेहरानमधील निवासस्थानी हवाई हल्ला झाला. यात हनियेसह त्याचा एक सुरक्षारक्षक ठार झाल्याची माहिती हमास आणि इराणच्या अधिकाऱ्यांनी दिली. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी हत्येचा बदला घेण्याची भाषा सुरू केली आहे. ‘इस्रायलने अत्यंत कठोर शिक्षा ओढवून घेतली आहे. आमच्या लाडक्या पाहुण्याची हत्या झाली आहे. याचा बदला घेणे, हे आमचे कर्तव्य आहे,’’ असे खामेनी यांनी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर लिहिले आहे.

हेही वाचा >>>Shatrughan Sinha : “पंतप्रधान मोदी आता राहुल गांधींच्या…”, अनुराग ठाकूरांच्या ‘त्या’ विधानावरून शत्रुघ्न सिन्हा यांची टीका!

इस्रायलअमेरिकेचे मौन बैरूतमधील हल्ल्याची तातडीने जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्रायली लष्कराने हनियेच्या हत्येबाबत संपूर्ण मौन बाळगले आहे. साधारणत: परदेशी जमिनीवर मोसाद किंवा अन्य यंत्रणांद्वारे केलेल्या राजकीय हत्यांची जबाबदारी इस्रायल स्वीकारत नाही, असा इतिहास आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनेही या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

चीनकडून निषेध विविध पॅलेस्टिनी गटांमध्ये एकी घडविण्यात मध्यस्थी केलेल्या चीनने हनियेच्या हत्येचा निषेध केला आहे. यामुळे पश्चिम आशियामध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची भीती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लिन जिआन यांनी व्यक्त केली.