ऑस्ट्रेलियात मेलबोर्नमधील विविध देशांच्या दूतावासांना संशयास्पद पाकिटे पाठवण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियन प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तात्काळ पावले उचलली आहेत. मेलबोर्नमधील भारतीय दूतावासालाही हे संशयास्पद पाकिट मिळाले असून पाकिट मिळाल्यानंतर तात्काळ दूतावास रिकामा करण्यात आला आहे. मेलबोर्नमधील अन्य देशांच्या दूतावासांमध्येही असेच पाकिट पाठवण्यात आले आहे.

मेलबोर्न ऑस्ट्रेलियातील दुसरे मोठे शहर आहे. कॅनबेरामध्ये भारतीय उच्च आयोगाचे कार्यालय आहे. तिथे अशा प्रकारचे संशयास्पद पाकिट आलेले नाही. भारत, यूके, न्यूझीलंड, जापान, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, जर्मनी, ग्रीस, स्पेन, स्वित्झर्लंड, क्रोएशिया आणि इजिप्त या देशांच्या दूतावासांना सुद्धा संशयास्पद पाकिटे पाठवण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

मेलबोर्नमधील दहा आंतरराष्ट्रीय दूतावासांना हे पाकिट मिळाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियन पथकाने तात्काळ पावले उचलली आहेत. भारतीय आणि अमेरिकन दूतावासाबाहेर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांना सज्ज ठेवण्यात आले आहे.

पोलीस आणि इमर्जन्सी सेवांकडून तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही पाकिटे कोणी पाठवली त्याची चौकशी करण्यात येईल असे ऑस्ट्रेलियन पोलिसांनी टि्वट करुन सांगितले आहे. इमर्जन्सी सेवा बजावणारे कर्मचारी केमिकल सूट घालून काही इमारतींमध्ये गेले आहेत. जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. सिडनीमधल्या अर्जेंटिनातील दूतावासात संशयास्पद सफेद पावडर सापडली होती. त्यानंतर दोन दिवसात ही घटना घडली आहे.

Story img Loader