पीटीआय, कोलकाता

पश्चिम बंगालच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांना मंगळवारी हिवाळी अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विधानसभेमध्ये राज्यघटना दिनावर चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला.

‘देशाची राज्यघटना धोक्यात कशी आहे’ यावर नियम १६९अंतर्गत ठराव मांडण्यात आला होता. त्यावरील चर्चेदरम्यान भाजपचे आमदारशंकर घोष यांनी ‘काही भाजप आमदार आमदारकीचा राजीनामा न देता पक्षातून बाहेर पडल्यानंतरही आमदार कसे राहिले आहेत’, असा मुद्दा उपस्थित केला. त्यांची ही टिप्पणी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. त्यानंतर अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदार अध्यक्षांसमोरील मोकळय़ा जागेत एकत्र आले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर आमदारांनी सभात्याग केला.यानंतर तृणमूलचे आमदार तपस रे यांनी अधिकारी यांच्याविरोधात निलंबनाचा ठराव आणला. त्यानंतर विधिमंडळ कामकाजमंत्री सोवनदेब चट्टोपाध्याय यांनी सुवेंदू अधिकारी यांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित केले जात असल्याचे जाहीर केले.

Story img Loader