भारताची स्वच्छता मोहीम ही जगातील सर्वात मोठी चळवळ ठरली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात काढले. महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांचा प्रारंभ करताना ‘आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलना’त ते बोलत होते. गांधीजींनी स्वातंत्र्य आणि स्वच्छता यामध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सरकारी कार्यालयांपासूनच स्वच्छतेला अग्रक्रम दिला जात असून या कार्यालयांत आता स्वच्छतेच्या बाबतीत बाबूगिरी नव्हे, तर गांधीगिरीच चालेल, असेही त्यांनी सांगितले. देशातील पाच लाख गावे हागणदारीमुक्त झाली असून देशात शौचासाठी उघडय़ावर बसणाऱ्यांची संख्या ४० टक्क्यांनी घटली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. देशातील ग्रामीण स्वच्छता २०१४ पूर्वी केवळ ३८ टक्के होती ती आता ९४ टक्के झाली आहे, केवळ चार वर्षांत हा फरक पडला आहे. देशातील २५ राज्ये हागणदारीमुक्त झाली आहेत. गेल्या चार वर्षांत केवळ शौचालये बांधण्यात आली नाहीत तर ९० टक्के शौचालयांचा नियमित वापरही सुरू झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.