मधुमेहींसाठी एक चांगली बातमी म्हणजे रक्तातील साखर मोजण्यासाठी स्वदेशी बनावटीची रक्तशर्करा तपासणी पट्टी अवघ्या पाच रुपयात सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर ५०० ते ८०० रुपये किमतीचे ग्लुकोमीटरही उपलब्ध करण्यात आले.
आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, यापुढे मधुमेहींना आमच्या या योजनेचा फायदा होईल. स्वदेशी बनावटीची उपकरणे रक्तातील साखर अचूकपणे मोजण्यास उपयुक्त ठरतील. मधुमेहाच्या विरोधात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लढा देण्याची ही पहिली पायरी आहे. आतापर्यंत आयात केलेल्या रक्तशर्करा तपासणी पट्टय़ा वापरल्या जात होत्या व त्या एका पट्टीची किंमत ३५ रु. आहे. परदेशी कंपन्यांचे ग्लुकोमीटरही २५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे असतात. जगात किमान ३८.२ कोटी लोकांना मधुमेह आहे. भारतात मधुमेही रुग्णांची संख्या ६.५ कोटी आहे, चीननंतर मधुमेहींचे सर्वाधिक प्रमाण भारतात आहे. आणखी १७.५ कोटी लोक भारतात मधुमेहाच्या मार्गावर आहेत.  रक्तशर्करा चाचणी पट्टय़ा व ग्लुकोमीटर हे बिर्ला इन्स्टिटय़ूट  ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबाद तसेच आयआयटी, मुंबई यांनी मे. बायसेन्स टेक्नॉलॉजीज या कंपनीच्या माध्यमातून तयार केल्या आहेत.