स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद पुन्हा चर्चेत आला आहे. साधारण दहा वर्षापूर्वी सेक्स सीडीप्रकरणामध्ये अडकलेल्या नित्यानंदने देशामधून पलायन केले आहे. इतकचं नाही तर त्याने दक्षिण अमेरिकेतील इक्वोडोर देशाच्या जवळ एक बेट विकत घेतले असून त्या बेटाला देश म्हणून घोषित केलं आहे. नित्यानंदने या देशाला ‘कैलास’ असं नाव दिलं असून हे जगातील सर्वोत्कृष्ट हिंदूराष्ट्र असल्याचं म्हटलं आहे. इतकचं नाही तर या देशाला संयुक्त राष्ट्रांनी मान्यता द्यावी अशी विनंतही त्याने केली आहे. विशेष म्हणजे या राष्ट्रच्या निर्मितीसाठी हातभार लावण्याचे आवाहन करत एका वेबसाईटच्या माध्यमातून देणगी गोळा करण्यासही सुरुवात केली आहे.
‘कैलास’ या देशाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, ‘कैलास हा सिमांचे बंधन नसणारा देश आहे. हा देश जगभरामधून हकलवून लावण्यात आलेल्या हिंदू लोकांनी एकत्र येऊन बनवला आहे. आपल्याच देशात हिंदू धर्माचा अभ्यास करण्याचा हक्क गमावलेल्या लोकांनी वसवलेला हा देश आहे.’ या देशाचा वेगळा पासपोर्ट असून नित्यानंदने वेबसाईटवर त्याची कॉपीही अपलोड केली आहे.
या वेबसाईटवरील माहितीनुसार विज्ञान, योग, ध्यान आणि गुरुकूल शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करणारा हा देश आहे. या देशामध्ये आरोग्य सेवा, शिक्षण आणि जेवण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नित्यानंदने आता जगभरातील लोकांना या देशाचा नागरिक होण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
कोण आहे नित्यानंद
नित्यानंद हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याचे खरं नाव राजशेखरन असं आहे. २००० साली त्याने बंगळूरु शहराजवळ स्वत:चे आश्रम सुरु केले. तेव्हापासूनच तो चर्चेत आला. स्वत:ला ईश्वराचा अवतार मानतो. २०१० साली त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार प्रकरणात पौरुषत्वाची चाचणीचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. काही महिन्यांपूर्वीच गुजरात पोलिसांनी नित्यानंदने भारतामधून पलायन केल्याची माहिती न्यायलयाला दिली होती. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१८ साली नित्यानंदला जामीन मंजूर झाला. याचाच फायदा घेत तो देशातून पळून गेला. त्याचा पासपोर्टची मुदत २०१८ साली सप्टेंबर महिन्यामध्ये संपली होती. स्थानिक पोलिसांनी त्याच्या पासपोर्टच्या रिन्यूअलची विनंती फेटाळू लावली होती. मात्र तरीही तो देशाबाहेर कसा पळून गेला याबद्दल आता चर्चांना उधाण आले आहे.