शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिला प्रवेशाच्या आदेशाचे समर्थन करणाऱ्या स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर विरोधकांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. यामध्ये आश्रमातील काही वाहने समाजकंटकांनी पेटवून दिली आहेत. दरम्यान, या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री पिनरायि विजयन म्हणाले, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा वैचारिकदृष्ट्या सामना करु शकत नाही तेव्हा असा प्रकारचे हल्ले केले जातात.


थिरुवअनंतरपुरमच्या कुंदमंकडवू येथील स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर काही अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी सकाळी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन कार, एक दुचाकी जाळण्यात आली आहे. स्वामी गिरी हे भगवतगिता स्कूलचे संचालक आहेत. तसेच त्यांनी शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचे समर्थन केले आहे.

केरळचे भाजपा प्रदेशाध्यक्ष श्रीधरन पिल्लई, थाजोमन तंत्री आणि पंडलम रॉयल फॅमिलीचा या हल्ल्यामागे हात असल्याचा आरोप स्वामी गिरी यांनी केला आहे. लोकांना सत्य सांगण्याऱ्यांना उध्वस्त करण्याचा यांचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री विजयन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. जेव्हा वैचारिक लढा देता येत नाही तेव्हाच अशा प्रकारचे हल्ले होतात असे त्यांनी म्हटले आहे. तर केरळमध्ये कोणालाही कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेता येणार नाही, असे केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader