स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांचा माझ्यावर सर्वाधिक प्रभाव असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये सांगितले. शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विद्यार्थ्यांशी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवलेल्या देशभरातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिले.
तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा आहे, या प्रश्नाला उत्तर देताना मोदी यांनी आपण लहानपणी खूप पुस्तके वाचली. त्यामध्ये सर्वाधिक पुस्तके ही स्वामी विवेकानंदांची होती. तेव्हापासूनच त्यांच्या पुस्तकांचा आपल्यावर सर्वाधिक प्रभाव असल्याचे सांगितले.
यशस्वी होण्याची काय रेसिपी आहे, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, यशस्वी होण्याची कोणतीही रेसिपी नाही आणि असूही नये. यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने दृढनिश्चय केला पाहिजे. यशाच्या दिशेने प्रवास करताना अनेकवेळा अपयश येते. पण अपयशामुळे खचून चालत नाही. अपयशातून बोध घेतला पाहिजे आणि मार्गक्रमण केले पाहिजे. अपयशातून जो शिकतो, तोच खरा यशस्वी असतो, असेही त्यांनी सांगितले.
उत्तम वक्तृत्त्व कलेसाठी काय केले पाहिजे, यावर नरेंद्र मोदी म्हणाले, चांगले बोलता येण्यासाठी आधी चांगला श्रोता बनले पाहिजे. वेगवेगळ्या व्यक्तींचे भाषण ऐकल्यावर त्यातून आपण बरेच काही शिकू शकतो. त्याचबरोबर कोणतीही भीती न बाळगता निर्भिडपणे आपले विचार मांडायला शिकले पाहिजे.
देशसेवा म्हणजे मोठे काहीतरी करणे हा गैरसमज असल्याचे सांगून प्रत्येक व्यक्ती वीजबचत, इंधनबचत यासारख्या माध्यमातूनही आपापल्यापरिने देशसेवा करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
देशाच्या अनेक गावांमध्ये अजून दिवसभर वीज मिळत नाही. मग डिजिटल इंडिया संकल्पना राबवणे कसे शक्य आहे, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणामध्येही मी याचा उल्लेख केला होता. मात्र, पुढच्या १००० दिवसांमध्ये देशातील १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी संबंधित अधिकाऱयांशी चर्चा केली आहे. ते यासाठी प्रयत्न करताहेत. वीज नाही म्हणून डिजिटल इंडिया थांबणार नाही. आम्ही सौरऊर्जेच्या पर्यायांवरही विचार करतो आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा