भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी यांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याविरुद्ध छेडलेल्या युद्धात आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी उडी घेतली आहे. मोदींना अर्थमंत्रीपदाचा कारभार जेटलींऐवजी सुब्रमण्यम स्वामी यांच्याकडे द्यायचा आहे का, असा थेट सवाल दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला आहे. नेहरू-गांधी घराण्यावर टीका करण्याच्या मोबदल्यात मोदींकडून काहीतरी बक्षिस मिळणार, याची स्वामींना खात्री आहे. त्यानुसार काँग्रेसशी प्रामाणिक असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करणे, हे स्वामींचे धोरण आहे. याशिवाय, सध्या स्वामींचे खरे लक्ष्य अरविंद सुब्रमण्यम नसून अर्थमंत्री अरूण जेटली आहेत.
अरविंद सुब्रमण्यम यांची हकालपट्टी करा, सुब्रमण्यम स्वामींची नवी मागणी 
वस्तू व सेवा विधेयकामध्ये काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमागे अरविंद सुब्रमण्यम यांचाच हात असल्याचा आरोपही स्वामी यांनी आज केला होता. ज्या व्यक्ती सरकारच्या कामावर परिणाम करू शकतात. सरकारची धोरणे अपयशी ठरवू शकतात. त्यांना त्या पदावरून काढले पाहिजे, असे स्वामी यांनी म्हटले होते.